(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dhule : एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात धुळे जिल्ह्यातून 'या' दोन नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता
Maharashtra Political Crisis : खान्देशातील धुळे जिल्ह्यात देखील मंत्रिमंडळ कसं असणार आणि त्यात जिल्ह्यातील कुणाला संधी मिळणार याची चर्चा आहे.
Maharashtra Political Crisis : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला आहे. आता सर्वांना आतुरता आहे ती नवं मंत्रीमंडळ कसं असेल. खान्देशातील धुळे जिल्ह्यात देखील मंत्रिमंडळ कसं असणार आणि त्यात जिल्ह्यातील कुणाला संधी मिळणार याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात धुळे जिल्ह्यातून विधान परिषदेचे आमदार अमरीश पटेल यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकेकाळी काँग्रेसचे कट्टर समर्थक म्हणून अमरीश पटेल यांची ओळख होती. मात्र 2019 साली विधानसभा निवडणुकीच्या वेळी अमरीश पटेल यांनी भाजपात प्रवेश केला. काँग्रेसच्या काळात 2003 ते ऑक्टोबर 2004 कालावधीत शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. यामुळे अमरीश पटेल यांच्या नावाची राजकीय वर्तुळातून शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोण आहेत अमरीश पटेल (Amrish Patel Profile)
पक्ष : भारतीय जनता पार्टी
मतदारसंघ : धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था
राजकीय प्रवास :
सन 1990 ते 1995, 1995 ते 1999, 1999 ते 2004, 2004 ते 2009 मध्ये महाराष्ट्र विधानसभेत शिरपूर तालुका मतदारसंघाचे आमदार म्हणून कामकाज पाहिले.
तसेच महाराष्ट्र विधानपरिषदेवर धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक मतदारसंघातून 2010 ते 2016, 2016 ते 2019, 2020 ते 2022 तसेच जानेवारी 2022 पासून पुन्हा सहा वर्षांसाठी आमदार म्हणून बिनविरोध निवडून आले. जानेवारी 2003 ते ऑक्टोबर 2004 कालावधीत शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी कामगिरी केली आहे.
जयकुमार रावल यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात धुळे जिल्ह्यातून आमदार जयकुमार रावल यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी राज्याचे पर्यटन मंत्री म्हणून काम पाहिले आहे. उत्तर महाराष्ट्रातील तरुण नेतृत्व म्हणून आमदार जयकुमार रावल यांच्याकडे पाहिलं जातं.
कोण आहेत जयकुमार रावल (Jaykumar Raval Profile)
2004 ते 2009 आणि 2009 ते 2014 या कालावधीत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. 2004 मध्ये त्यांनी विधिमंडळ सदस्यांची युथ फोरम नावाने संघटना स्थापन केली; ते पंचायत राज समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती व क्रीडा धोरण समितीचे सदस्य होते. ऑक्टोबर 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली. जून 2015 पासून ते रोजगार हमी योजना समितीचे समिती प्रमुख आहेत. 2014 ते 2019 दरम्यान त्यांनी राज्याचे पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.