Amal Mahadik on Satej Patil : बंटी पाटील, आज सात वाजता बिंदू चौकात या, माजी आमदार अमल महाडिकांचं ओपन चॅलेंज
आम्ही 37 वर्षाचे अहवाल तुम्हाला दाखवतो तुम्ही एक वर्षाचे दाखवा. तुमची भाषा मग्रुरीची आहे. सतेज पाटील पहिल्यांदा तुम्हाला आमदार केलं ते महादेवराव महाडिकांनी असा टोला अमल महाडिकांनी लगावला.

Amal Mahadik on Satej Patil : अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या राजाराम साखर कारखान्यासाठी दुरंगी लढत निश्चित झाल्यानंतर प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. सत्ताधारी महाडिक गटाचे नेते माजी आमदार अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांनी आज आमदार सतेज पाटील यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. अमल महाडिक यांनी सतेज पाटलांना बिंदू चौकात येण्याचे जाहीर आव्हान दिले आहे. मी सुद्धा येतो, तुम्ही सुद्धा सात वाजता या, असे आव्हानच त्यांनी दिले.
अमल महाडिक म्हणाले की, महाडिक साहेबांनी 27 वर्षे हा कारखाना सभासदांचा ठेवला आहे. कारखान्याचा 7/12 छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना नावाने आहे. बंटी पाटील कुणाचं काही तरी ऐकून तोंडावर पडू नका. आम्ही 37 वर्षाचे अहवाल तुम्हाला दाखवतो, तुम्ही एक वर्षाचे दाखवा. तुमची भाषा मग्रुरीची आणि खोटारडेपणा हे तुमचं सूत्र आहे. सतेज पाटील पहिल्यांदा तुम्हाला आमदार केलं ते महादेवराव महाडिकांनी केलं. विधानपरिषदेला मी माघार घेतली म्हणून तुम्ही आमदार झाला.
बावड्यात येऊन फिरणारच
अमल महाडिक पुढे म्हणाले की, आम्हाला धमकी दिली तरी आम्ही घाबरत नाही, आणि बावड्यात येऊन फिरणारच. सतेज पाटील लिमिटमध्ये रहा आणि लिमिटबद्दल बोला. आम्ही तुमच्या वडीलधाऱ्या माणसांवर बोलत नाही. मात्र, तुम्ही महादेवराव महाडिक यांच्यावर बोलणं बंद करा अन्यथा जशास तसं उत्तर देऊ. बिंदू चौकात 7 वाजता येतो, तुम्ही देखील या. तुमच्या सोबत बोलणारे लोक तुमचे घात करणार आहेत. निवडणूक लागली की, तुम्ही सभासदांच्या घरी जात असता, आम्ही त्यांच्या सुखदुःखात सहभागी असतो. आमच्या सभासदांचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
सत्तारूढकडून 14 विद्यमान संचालकांना संधी नाकारली
दरम्यान, राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाने 14 विद्यमान संचालकांना नारळ दिला आहे. विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह पाच संचालकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक हे स्वतः संस्था गटातून रिंगणात आहेत. दुसरीकडे, विरोधी राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीकडून यामध्ये 16 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विरोधी आघाडीकडून 'आमचं ठरलंय, कंडका पाडायचा, उसाला दर मिळवायचा' ही टॅगलाईन आता प्रचारात दिसेल. 29 उमेदवार अवैध ठरल्याने बरेच नवीन चेहऱ्यांना संधी विरोधी आघाडीकडून मिळाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
