राष्ट्रपती भवनातील प्रसिद्ध मुघल गार्डन 12 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुले, पर्यटकांसाठी पर्वणी
दिल्लीच्या राष्ट्रपती भवन परिसरातील प्रसिद्ध असणारे ऐतिहासीक मुघल गार्डन 12 फेब्रुवारीपासून खुले करण्यात येणार आहे. मुघल गार्डन पाहणे ही देश विदेशातील पर्यटकांसाठी एक पर्वणी असते.
Mughal Garden Opening for Public : देशात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. रुग्ण संख्या कमी होत असल्याने अनेक राज्यांमध्ये कोरानाचे निर्बंध शिथील केले आहेत. देशाची राजधानी दिल्लीतही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे तेथील निर्बंध शिथील केले आहेत. शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. अशातच दिल्लीच्या राष्ट्रपती भवन परिसरातील प्रसिद्ध असणारे ऐतिहासीक मुघल गार्डन 12 फेब्रुवारीपासून खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता हे आकर्षणस्थळ पाहता येणार आहे.
राष्ट्रपती भवनाकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये 12 फेब्रुवारीपासून मुघल गार्डन सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 12 फेब्रुवारी ते 16 मार्चपर्यंत सोमवार सोडून हे मुघल गार्डन सामान्य नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
कोरोनामुळे बंद केले होते मुघल गार्डन
कोरोनाच्या संकटामुळे दुसऱ्या लाटेदरम्यान दिल्लीत अनेक निर्बंध लादण्यात आले होते. यावेळी मुघल गार्डनही सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, राष्ट्रपती भवनात असलेले मुघल गार्डन 15 एकर परिसरात पसरले आहे. मुघल गार्डनची वैशिष्ट्यं म्हणजे जम्मू काश्मीरातील मुघल गार्डनच्या धर्तीवर सर एडविन ल्युटियन्स यांनी राष्ट्रपती भवनात मुघल गार्डनची निर्मिती केली. राष्ट्रपती भवनाचा आत्मा, असे याचे वर्णन केले जाते. मोठ्या आयताकृती बागेतील सुंदर आणि शोभिवंत झाडे आणि वनस्पतींसह कारंजावरील रंगीबेरंगी फुलांचे गालिचे येथे येणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेतात.
भारतीय आणि पाश्चिमात्य अश्या दोन्ही प्रकारे या उद्यानाची रचना केली आहे. याठिकाणी विविध प्रकारची फुले, हर्बल गार्डन आहे. गुलाब, ट्युलिप आणि हर्बल गार्डन ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. या बागेत अनेक जातींचे गुलाब असून, त्यात राणी एलिझाबेथ, मदर तेरेसा, ब्लॅक रोझ, ब्ल्यू मून, ग्रीन रोझ असे विविध गुलाब प्रकार आहेत. दरवर्षी अनेक भारतीय आणि परदेशी नागरिक ही बाग बघायला मोठी गर्दी करतात. 1917 साली तयार करण्यात आलेलं मुघल गार्डन तब्बल 15 एकरावर पसरलेलं आहे. भारतीय आणि पाश्चात्य देशांमधील फुलांची विशेष लागवड करण्यात आली आहे. 159 जातीची विशेष फुलं गार्डनमध्ये फुलवण्यात आली आहेत, तसंच 50 प्रकारची इतर झाडंही लावण्यात आली आहेत. ट्युलिप, लिली, डॅफोडिलसह इतर मोसमी फुलांचे ताटवे तुमच्या स्वागताला तयार असतात. म्युझिकल गार्डन, आयुर्वेदिक फुलांचे ताटवे, बोन्साय ही मुघल गार्डनची खास वैशिष्ट्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Chenab Railway Bridge : जम्मू काश्मीरमध्ये बनतोय जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, सुंदर फोटो पाहिलात का?
- Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत ईडी-भाजपविरोधात आक्रमक; पत्रकार परिषदेतील 10 प्रमुख मुद्दे