Sambhaji Bhide VIDEO : कुणाल कामरावरुन विधानसभेत धुडगूस घालणारे नीX, ते सगळे देशद्रोही; संभाजी भिडेंचा संताप
Sambhaji Bhide On Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरणावरुन विधानसभेत धुडगूस घालणे म्हणजे लोकशाहीविरोधात आहे असं म्हणत संभाजी भिडे यांनी सत्ताधारी तसेच विरोधकांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

सांगली : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कुणाल कामरा प्रकरण चांगलंच गाजलं. त्यावरून सत्ताधारी असो वा विरोधक, त्यांनी सभागृहात चांगलाच गोंधळ घातल्याचं दिसून आलं. या प्रकरणावर आता संभाजी भिडे गुरुजी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणाल कामरा प्रकरणावरून विधानसभेत गोंधळ घालणारे हे सगळे नीच आहेत, देशद्रोही आहेत असं संभाजी भिडे म्हणाले. तसेच रायगडवरच्या वाघ्या कुत्र्याची कथा ही सत्य आहे, संभाजीराजे भोसले जे बोललेत ते चुकीचं आहे असा दावाही संभाजी भिडेंनी केला. ते सांगलीमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.
हे लोकशाहीला शोभणारं नाही
कुणाल कामरा प्रकरणावरून विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी हक्कभंग प्रस्ताव आणला. सभागृहाच्या कामकाजाचा महत्त्वाचा वेळ हा या प्रकरणावर गेला. त्यावरून संभाजी भिडेंनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, "कुणाल कामरा हा जो नादानपणा सुरू आहे आणि त्यावरून विधानसभेत जो धुडगूस सुरू आहे तो काही लोकसभेला शोभणारा नाही. मी कुठल्या व्यक्तीचं नाव घेत नाही, पण ज्यांनी ज्यांनी हा निचपणा केलाय ते सगळे देशद्रोही आहेत."
आर आर आबांची हिंमत अलौकीक होती. त्यांनी डान्स बार बंद करण्याची धमक दाखवली. आताचे कामरा नावाच्या पद्धतीची हॉटेल चालवणे म्हणजे डान्सबारची सावत्र भावंड आहेत असं संभाजी भिडे म्हणाले.
संभाजीराजे जे बोलले ते चूक
रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद तापला असून त्यावर संभाजीराजे छत्रपतींनी आक्षेप घेतला आहे. या कुत्र्याच्या समाधीला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही, संदर्भ नाही असा दावा त्यांनी केला. हा पुतळा 31 मे पर्यंत राज्य सरकारने काढावा अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
संभाजीराजेंच्या या भूमिकेवर बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, "संभाजीराजे भोसले जे बोलतात ते चूक आहे. वाघ्या कुत्र्याची कथा सत्य आहे. वाघ्याने शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतली होती. त्या काळी माणसे एकनिष्ठ नव्हती तेवढी एकनिष्ठ कुत्री होती हे दाखवण्यासाठी हा पुतळा आवश्यत आहे."
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक कविता केल्यानंतर कॉमेडियन कुणार कामराच्या विरोधात महाराष्ट्र विधीमंडळात हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला आहे. या प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावरही हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला आहे.
ही बातमी वाचा:























