ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रायगड जिल्ह्यात मोठा झटका देणाऱ्या स्नेहल जगताप यांनी आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

रायगड : विधानसभा निवडणुकीतील शिवसेना युबीटी पक्षाच्या उमेदवार आणि महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप (Snehal jagtap) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर रायगड जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आक्रमक झाल्याचं पहावयास मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी माणगाव येथे आयोजित केलेल्या बैठकीत स्नेहल जगताप यांच्यावर अनेक घणाघात केले आहेत. स्नेहल जगताप यांनी घेतलेला निर्णय हा दुर्दैवी आहे. याशिवाय त्यांनी राजकीय आत्महत्या केल्याचा दावा देखील या शिवसैनिकांनी केला. ज्यांच्या जीवावर यंदाची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली त्या निष्ठावंत शिवसैनिकांचा आणि उद्धव ठाकरेंचा त्यांनी विश्वासघात व भ्रमनिरास केल्याची भावना येथील शिवसेना (Shivsena) पदाधिकारी व शिवसैनिकांनी व्यक्त केली. तसेच, स्नेहल जगताप यांना राजकारणात भविष्यात कधीही यश मिळणार नसल्याचेही ते म्हणाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रायगड जिल्ह्यात मोठा झटका देणाऱ्या स्नेहल जगताप यांनी आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी, अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक केल आहे. तसेच, राष्ट्रवादीत लवकरच महत्त्वाची जबाबदारी देखील त्यांना देण्यात येणार असल्याचे समजते. तर, मी रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे स्नेहल जगताप यांनी पक्षप्रवेशावेळी भाषण करताना म्हटले. मात्र, स्नेहल जगताप यांनी घेतलेला निर्णय हा अतिशय दुर्दैवी असल्याचे शिवसेना युबीटी जिल्हाप्रमुख नंदू शिर्के यांनी म्हटले. तसेच, स्नेहल जगताप यांनी हा निर्णय घेऊन राजकीय आत्महत्या केल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
स्नेहल जगताप यांच्यावर कोणती जबाबदारी?
दरम्यान, रायगडच्या सुतारवाडीत दोन दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहल जगताप यांचे कुटुंब भेटीला आले होते. त्यावेळी तटकरे आणि जगताप कुटुंबात 2 तास बंद दाराआड चर्चा झाली. अखेर जगताप यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा निर्णय नक्की झाला, त्यानुसार आज पक्षप्रवेशही झाला. त्यामुळे, आता स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादी पक्षात तटकरे यांच्याकडून कोणती जबाबदारी देण्यात येईल, याचीच चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे जगताप कुटुंबावर ठाकरेंची शिवसेना नाराज झाली आहे. स्नेहल जगताप यांना भविष्यात कुठेही यश मिळणार नसल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जात आहे.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
