ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशन स्वीकारावे; धनंजय मुंडेंचं निवडणूक आयोगाला पत्र
Grampanchayat Election: कालपासून निवडणुक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने अर्ज भरण्याची प्रकिया ठप्प पडली आहे.
Maharashtra Grampanchayat Election Updates: राज्यात सध्या 7 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची (Grampanchayat Election) धामधूम सुरू असून, सरपंच आणि सदस्य पदासाठी ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन स्वीकाराले जात आहे. मात्र कालपासून निवडणुक आयोगाची (Election Commission) वेबसाईट चालत नसल्याने अर्ज भरण्याची प्रकिया ठप्प पडली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशन स्वीकारावे अशी मागणी करणारे पत्र धनंजय मुंडें (Dhananjay Munde) यांनी निवडणूक आयोगाला पाठवले आहे.
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत सरपंच व अन्य उमेदवारांचे नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगामार्फत सध्या सुरू असून, यांतर्गत अर्ज सादर करताना निवडणूक आयोगाची वेबसाईट सतत हँग होणे किंवा सर्व्हर डाऊन होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची पळापळ पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशन स्वीकारावे अशी मागणी करणारे पत्र धनंजय मुंडें यांनी निवडणूक आयोगाला पाठवले आहे.
धनजय मुंडे यांचे पत्र
मुंडे यांनी निवडणूक आयोगाला लिहलेल्या पत्रात म्हटले आहे, शुक्रवार 02 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून आजपर्यंत अपेक्षित अर्जांचे सादर करण्यात आलेले प्रमाण अत्यंत अल्प आहे. संबंधित वेबसाईट सतत हँग होण्यामुळे किंवा सर्व्हर डाऊन असल्यामुळे अजूनही बरेच उमेदवार आपले नामनिर्देशन भरू शकले नाहीत. त्यामुळे हीच परिस्थिती राहिल्यास निर्धारित वेळेत अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही. ग्रामीण भागातील अनेक उमेदवार आपले नामनिर्देशन सादर करण्यापासून वंचित राहू शकतात. ही बाब विचारात घेऊन निवडणूक आयोगाने तात्काळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश द्यावेत, असे मुंडे यांनी निवडणूक आयोगाला लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.
इच्छुकांनी रात्र जागून काढली...
अवघ्या दोन दिवसांचा कालवधी शिल्लक राहिला असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच आणि सदस्य पदासाठी इच्छुकांची धावपळ उडाली आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईन केंद्रात उमेदवार गर्दी करत आहे. मात्र अशात निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने इच्छुकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अर्ज भरण्यासाठी अनेक ठिकाणी इच्छुकांनी अक्षरशः रात्र जागून काढली आहे. मात्र असे असतांना देखील वेबसाईट चालत नसल्याने इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.