Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीने छगन भुजबळांचे खूप लाड केले आहे. त्यांचे अजून किती लाड करायचे? असा सवाल उपस्थित करत माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय.
Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीने छगन भुजबळांचे खूप लाड केले आहे. त्यांचे अजून किती लाड करायचे? असा सवाल उपस्थित करत राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. जो जे वांच्छिल ते तो लाभो. त्यांना कुठे जायचे तिकडे जाऊद्यात, असे देखील माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ कमालीचे नाराज आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच छगन भुजबळ यांची गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भुजबळ यांनी दोनदा भेट झाली आहे. तसेच पुण्यातील एका कार्यक्रमात छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) एकत्र आले होते. यावेळी शरद पवारांनी कार्यक्रमाच्या पत्रिकेवर एक संदेश लिहिला. छगन भुजबळ यांनी तो संदेश वाचला. त्यानंतर दोघांमध्ये काही सेकंद संवाद झाला आणि दोघे एकमेकांकडे बघून हसले होते. त्यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादी अजित पवार गटातच राहणार की? वेगळा काही निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा डिवचले आहे.
नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
माणिकराव कोकाटे म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याचे म्हणत असतील, तरी मला तसे वाटत नाही. पक्षाने छगन भुजबळ यांचे खूप लाड केले आहेत. त्यांचे अजून किती लाड करायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच जो जे वांच्छिल ते तो लाभो. त्यांना कुठे जायचे तिकडे जाऊद्यात, असे देखील त्यांनी म्हटले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. माझे नेते अजित पवार आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. माझे दुसरे कोणीही नेते नसल्याचे देखील माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे.
याआधीही कोकाटेंची भुजबळांवर टीका
दरम्यान, काही दिवसांपूर्वीही माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. भुजबळांना ओबीसी म्हणून त्यांचा मुलगा आणि त्यांचा पुतण्या एवढेच दिसत असेल. दुसरे ओबीसी दिसत नसतील तर त्याला काय करणार? चूक असेल तर समजूत काढणार ना. चूकच नसेल तर समजूत कशाची काढणार? भुजबळांना मंत्रिपद न देऊन आमच्या पक्षाची कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही. आमच्या पक्षाने जो न्याय भुजबळांना दिला तो आतापर्यंत कोणत्याही पक्षाने दिला नाही, असे म्हणत माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला होता.
आणखी वाचा
धनंजय मुंडेंमुळं पक्ष अडचणीत येणार असेल तर अजित पवार... छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य