Rohit Pawar : बिनडोकाच्या नादाला लागून दादांचा कर्जत MIDC बाबत निर्णय, रोहित पवारांचा हल्ला, तानाजी सावंत 4 कोटी कमिशन खात असल्याचा दावा
Rohit Pawar On Ajit Pawar Statement : कर्जत एमआयडीसीचा निर्णय केवळ राजकीय विरोधामुळे प्रलंबित राहिला असून नागरिकांना दिलेला शब्द आपल्याला पाळता येत नसल्याचं दुःख होत असल्याचं आमदार रोहित पवार म्हणाले.
मुंबई: कर्जत एमआयडीसीप्रकरणी (Karjat Jamkhed MIDC) एका बिनडोक व्यक्तीच्या नादी लागून अजित पवार (Ajit Pawar) हे निर्णय घेत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. तसेच आरोग्य विभागातील सीएचओंना मिळणाऱ्या इन्सेंटिव्हमधून तानाजी सावंत (Tanaji Sawant) महिन्याला चार कोटींचे कमिशन खात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कर्जत जामखेड मतदारसंघातील एमआयडीसी प्रकरणी भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) जे सांगतील तसंच होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता रोहित पवारांनी अजित पवारांवर टीका केली आहे. तसेच राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावरही त्यांनी कमिशन खात असल्याचा आरोप केला.
बिनडोक व्यक्तीच्या नादी लागून एमआयडीसीचा निर्णय फिरवू नका
अतिशय अभ्यास करून एमआयडीसी मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु एका बिनडोक व्यक्तीच्या नादाला लागून अजित पवार एमआयडीसी रद्द करण्याचा निर्णय घेत असतील तर तो चुकीचा आहे. अजित पवार यांनी भूमिका बदलल्यानंतर ते पूर्वीची स्टाईल विसरत असतील तर हे चुकीचं आहे.
आपण कर्जतचे आमदार असून लोकांना शब्द दिला आहे. पण फक्त राजकीय विरोधातून एमआयडीसीचा निर्णय प्रलंबित केला जात असेल तर तो एकट्या रोहित पवाराचा विषय नाही तर आख्ख्या मतदारसंघाचा विषय आहे. जनतेला दिलेला शब्द मला पाळता येत नसल्याचं दुःख आहे. अजित पवार एमआयडीसीला विरोध करणाऱ्या व्यक्तीला साथ देत असतील तर पुतण्या म्हणून मला नक्कीच वाईट वाटेल. अजित पवार यांना विनंती आहे की कोण खरं आणि कोण खोटं हे त्यांनी पहावं आणि एमआयडीसी बाबतचा निर्णय घ्यावा.
तानाजी सावंत महिन्याला चार कोटींचे कमिशन खातात
आरोग्य विभागातील सीएचओ यांना इन्सेंटिव्ह मिळतो. मला एक पत्र आलं आहे त्यात नमूद करण्यात आलं आहे की ते पैसे आम्हाला आरोग्यमंत्री तनाजी सावंत यांना द्यावे लागतात. 10 हजार रुपये हवे असतील तर 3 हजार द्या असा प्रकार सुरू आहे. महिना चार कोटी रुपये तानाजी सावंत कमवत आहेत. तानाजी सावंत सरकारला भिकारी करायला निघाले आहेत.
भाजपसोबत जावं अशा आशयाच्या पत्रावर मी सही केल्याचं ते सांगत आहेत, ते पत्र त्यांनी दाखवावं. मी सही केवळ अजित पवार यांना विरोधी पक्षनेते करावे यासाठी केली. त्यामुळे मी पत्र चोरीचा आरोप केला आहे असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं.
रोहित पवारांनी किती संघर्ष केला ते काकांना माहित
रोहित पवारने काय संघर्ष केला हे रोहित पवार आणि त्यांच्या काकाला सुद्धा माहिती आहे. माझी कंपनी अडचणीत असताना माझ्याकडे पैसे नव्हते त्यावेळी कंपनीला अडचणीतून बाहेर कसं काढलं हे त्यांना माहिती आहे. आता माझ्यावर वेगवेगळ्या कारवाया सुरू आहेत. मी पहिला व्यवसायात स्थिर झालो आणि नंतर राजकारणात आलो. काही लोक हे आधी राजकारणात गेले आणि नंतर ते व्यवसायात स्थिर झाले. व्यवसाय करत असताना मला किती त्रास झाला हे मला माहिती आहे. बाकी इतरांच्या फाईल्स माझ्याकडे आहेत.
मराठा आरक्षणाचा विषय भाजपला सोडवायचा नाही
आरएसएस जातीय जनगणना नको म्हणत आहे, मग जातीयवाद निर्माण का करता? आता मराठा विरुद्ध ओबीसी वाद त्यांनी निर्माण केला आहे. कोरेगाव भीमाच्या वेळी देखील यांनी वाद निर्माण केला आणि त्याचा राजकीय फायदा करून घेतला. मराठा आरक्षणाचा विषय हा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मार्गी लावायचा असावा, मात्र भाजपला ते करायचा नाही. हे विषय मार्गे लावणार होते तर 50 टक्क्यांची अट आतापर्यंत का ओलांडली नाही?
ही बातमी वाचा: