Rohit Pawar : कर्जत MIDC प्रकरणी अजितदादांनी राम शिंदे सांगतात तसंच करावं, पण निर्णय चुकला तर मात्र शांत बसणार नाही; रोहित पवारांचा अजित पवारांना इशारा
Rohit Pawar On Karjat Jamkhed MIDC : कर्जत एमआयडीसीसंबंधी राज्य सरकारचा निर्णय चुकला तर आम्ही शांत बसणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

मुंबई: राज्याच्या राजकारणात पवार काका-पुतण्या आता पुन्हा एकदा आमने-सामने आले असून यावेळी निमित्त आहे ते कर्जत जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीचे (Karjat Jamkhed MIDC). कर्जत एमआयडीसी प्रकरणी भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) सांगतील तसंच होणार असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना (Rohit Pawar) इशारा दिला होता. त्यावर आता राम शिंदे हे सांगतील त्याप्रमाणे व्हावं, पण निर्णय चुकला तर मात्र आम्ही शांत बसणार नाही असा इशारा रोहित पवारांनी दिला.
कर्जत MIDC प्रकरणी अजित पवारांच्या वक्तव्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, अजितदादांनी राम शिंदे म्हणतील तसंच करावं, पण 1000 एकरापेक्षा कमी एमआयडीसी नको हे माझं मत आहे. एमआयडीसी करताना इतर प्रश्न देखील मार्गी लावा ही विनंती आहे. आम्ही जी जागा सूचवली आहे ती फॉरेस्ट आणि इतर गोष्टींपासून दूर आहे. त्या ठिकाणी मोठे उद्योग उभे राहू शकतात, गोडाऊन्स तयार होऊ शकतात. पण त्याठिकाणी जर फक्त गोडाऊन्स उभे राहिले आणि कारखाने दुसरीकडे असतील तर जास्त लोकांना रोजगार देता येणार नाही. अजितदादा याबाबतीत लक्ष घालतील. पण सरकारचा निर्णय जर चुकला तर आम्ही शांत बसणार नाही.
मराठा आरक्षणावर चर्चा होताना मंत्री उपस्थित नसतात
अधिवेशनात राज्याच्या हिताच्या चर्चा अजिबात होत नाहीत. मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल किंवा इतर समाजाच्या आरक्षणाबाबत या दोन दिवसात चर्चा झालेली पाहिलं. मात्र त्या चर्चेवेळी एकच मंत्री सभागृहात उपस्थित होते. इतर मंत्री अधिवेशनात उपस्थित नसतात, कुठेतरी जेवायला जातात आणि सगळे तिथेच बसतात. आरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर बोलताना पाच- सहा मंत्री तरी सभागृहात असावेत ही आमची अपेक्षा आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, बेरोजगारीचा मुद्द्यावर देखील चर्चा होणे आवश्यक आहे.
गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी गुंतवणूक
उत्तर प्रदेश, गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली पण महाराष्ट्रात गुंतवणूक खूप कमी झाली आहे. राज्यात केवळ 8 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे असा डेटा सांगतो. पुढील आठवड्यात चर्चा नाही झाली तर लोकांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल.
अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध
पीएचडीच्या विद्यार्थ्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, दादांकडून ही अपेक्षा नव्हती. दादा असं काहीतरी बोलतील ही अपेक्षा बिलकुल नव्हती. कारण शेवटी ती गरिबांची पोरं आहेत. सरकारला या मुलांना पाठिंबा देण्याची गरज आहे. पीएचडी करणं सोपं नाही. दादांनी त्यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याचा निशेष. मोठ्या पदावर बसलेले नेत्याने असं बोलू नये असं माझं मत आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
