Sulochana Chavan Passes Away : लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन; 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sulochana Chavhan : महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले आहे.

Sulochana Chavan : लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायनातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आज सायंकाळी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
सुलोचना चव्हाण यांचे आज दुपारी 12 च्या सुमारास मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. काही दिवसांपूर्वी सुलोचना चव्हाण यांचं कमरेचं हाड मोडलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज हरपला
भारत सरकारने त्यांना सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी 'पद्मश्री' या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज हरपला आहे. सोळावं वरीस धोक्याचं, उसाला लागलं कोल्हा, पाडाला पिकलाय आंबा, पावणा पुण्याचा आलाय गं, अशा शेकडो लावण्या त्यांनी अजरामर केल्या आहेत.
ठसकेबाज लावण्यांनी सुलोचना चव्हाण यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले होते. 'रंगल्या रात्री' या सिनेमासाठी त्यांनी पहिल्यांदा लावणी गायली होती. फडावरची लावणी त्यांनी रुपेरी पडद्यावर लोकप्रिय केली. लावणीच्या चपखल, फटकेबाज शब्दांना आपल्या सुरांच्या माध्यमातून ठसका देण्याचं काम त्यांनी केलं. सुलोचनाबाईंनी लावणीसह भावगीते आणि भक्तिगीतेदेखील गाऊन लोकसंगीताचे दालन समृद्ध केले होते.
सुलोचना चव्हाण यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुलोचना यांनी मराठीसह हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी याभाषांमध्येदेखील गाणी गायली आहेत.
सुलोचना चव्हाण यांनी स्वत:ला समाजकार्यातही झोकून दिले होते. कार्यक्रमातून मिळणाऱ्या मानधनातील मोठा हिस्सा त्या धार्मिक संस्थांना देत असे. तसेच कार्यक्रम व पुरस्कारांतून मिळणाऱ्या रकमेचा काही हिस्सा गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.
लावणीचा बाज आणि त्याची लोकप्रियता सुलोचना यांच्यामुळे टिकून राहिली असल्याचं म्हटलं जातं. सुलोचना चव्हाण यांनी 'माझे गाणे माझे जगणे' हे आत्मचरित्र लिहिले असून लावणीच्या संदर्भातील अनेक आठवणी त्यात आहेत.
(संग्रहित) Majha Katta : लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्याशी मनमोकळ्या गप्पा
संबंधित बातम्या
Sulochana Chavan : 'अशी' झाली लावणी गायनाची सुरुवात; लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी माझा कट्ट्यावर सांगितला होता खास किस्सा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

