(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sulochana Chavan : 'अशी' झाली लावणी गायनाची सुरुवात; लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी माझा कट्ट्यावर सांगितला होता खास किस्सा
Sulochana Chavan Passes Away : सुलोचनाबाई चव्हाण यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली. उर्दू नाटकं, हिंदी, मराठी, गुजराती या नाटकांतसुद्धा त्यांनी काम केलं होतं.
Sulochana Chavan Passes Away : ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लावणीमधलं शब्दांचं लावण्य आपल्या दमदार आवाजानं सगळ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात देखील मुलाखत दिली होती. या दरम्यान त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.
सुलोचनाबाई चव्हाण यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली. उर्दू नाटकं, हिंदी, मराठी, गुजराती या नाटकांतसुद्धा त्यांनी काम केलं होतं. साठ-सत्तरच्या दशकातला काळ तर त्यांनी अक्षरश: आपल्या ठसकेबाज गायनाने गाजवला होता.
लावणी तुमच्यापर्यंत कशी पोहोचली?
एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी माझा कट्ट्यावर लावणी तुमच्याकडे कशी आली? लावणीचा प्रवास कसा सुरु झाला असा प्रश्न विचारला असता, सुलोचनाबाई चव्हाण यांनी त्यांचा किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, आमच्याकडे एक मोठा ग्रामोफोन होता. आणि माझ्या भावाने एक रेकॉर्ड आणलं होतं. वत्सलाबाई कुंपेकर यांची सरकारी पाहुणेमधील बैठकीच्या लावणीची रेकॉर्डिंग लावली होती. ती लावणी अशी होती.. "सांभाळ गं...सांभाळ गं...सांभाळ दौलत लाखाची गं..तुझ्या ज्वानीची कस्तुरी पाहून गं..चहूबाजूंनी येतील पारधी गं..सांभाळ गं" हे रेकॉर्ड चालू होतं. आणि तेव्हा आईने ही बांगडी बंद करायला सांगितली होती. तेव्हा घरात फार वातावरण तापलं होतं पण ती लावणी ऐकूनच मी दुसऱ्या लावण्या म्हणायला लागले. आणि तिथून प्रवास सुरु झाला.
लता मंगेशकर, आशा भोसले यांच्याही आधीचा काळ त्यांनी गाजवला
सुलोचनाबाई म्हणाल्या, मी ज्या काळात गायचे म्हणजेच साठच्या दशकात त्या काळात समशाद बेगम, जोहराबाई, आमिरबाई यांची लावणी फार प्रसिद्ध असायची. त्यानंतर बराच काळ लोटल्यानंतर लता मंगेशकर, आशा भोसले यांची गाणी येऊ लागली.
'असा' होता हिंदी गायनातला प्रवास
सुलोचनाबाईंनी जवळपास 250 हून अधिक हिंदी चित्रपटांत पार्श्वगायन केलं. यापैकी काले बादल, ढोलक, तितली असे काही प्रसिद्ध चित्रपट होते. आपल्या पहिल्या रेकर्डिंगबाबतचा किस्सा देखील सुलोचनाबाईंनी कट्ट्यावर सांगितला होता. त्या म्हणाल्या, "माझं पहिलं रेकॉर्डिंग मी परकर पोलक्यात 'कृष्ण सुदामा' या चित्रपटासाठी केलं होतं. विशेष म्हणजे त्यांच्या आवाजात बालिशपणा नव्हता आणि म्हणून त्यांना एकावर एक प्रोजेक्ट मिळत गेले असंही सुलोचनाबाई म्हणाल्या.
तसेच, हिंदी चित्रपटातील त्यांचं आवडतं गाणं 'काले बादल' चित्रपटातील "मौसम आया है रंगीन, बजी है कही सुरिली बीन" हे होतं.
कवी आचार्य अत्रे यांनी मराठीत पहिला ब्रेक दिला
कट्ट्यावर आपल्या गायनाच्या प्रवासाबद्दल सांगताना सुलोचनाबाई चव्हाण म्हणाल्या, माझी गायनाची सुरुवात आधी हिंदी चित्रपटांपासून झाली. त्यानंतर मराठीत गाणी गायली. ज्येष्ठ कवी, लेखक, चित्रपट निर्माते आचार्य अत्रे यांनी पहिल्या मराठी गायनाची संधी दिली..."मुंबईच्या कालेजात गेले पती..माझे पती..अन् आले होऊन शान बीबीटी" हे पहिलं माझं मराठीतील गाणं रेकॉर्ड झालं होतं.
महत्त्वाच्या बातम्या :