Nagpur violence : नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
Nagpur violence : नागपूर हिंसाचार प्रकरणात फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpur violence : नागपूरात औरंगजेबच्या कबरी प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर सोमवारी सायंकाळी दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक झाल्याने या जमावाला आवरताना पोलीस आणि नागरिक ही जखमी झाले आहेत. या दंगलीचा मास्टरमाईंड असल्याचा ठपका मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान याच्यावर ठेवत त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आता नागपूर हिंसाचार प्रकरणात (Nagpur violence) सायबर पोलिसांनी (Police) सर्वात मोठी कारवाई केली आहे. फहीम खानला याच्यासह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त लोहित मतानी म्हणाले की, या प्रकरणात सायबर पोलीस ठाण्यात चार एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यात औरंगजेबच्या विरोधात जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचा व्हिडिओ लोकांनी तयार केला होता,व्हिडिओ रेकॉर्ड करून अफवा पसरवल्या गेल्या आणि दंगल भडकली. ज्या ज्या लोकांनी दंगल केली त्यांच्यावर एफआयआरदाखल करण्यात आली आहे. हिंसाचारात पोलिसांवर दगडफेक झाली आहे. या प्रकरणात 50 हून अधिक जण आरोपी आहेत. तर फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
नागपुरात कुठे-कुठे संचारबंदी?
दरम्यान, नागपुरात हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता याबाबत अपडेट समोर आली असून गणेशपेठ, कोतवाली व तहसील पोलीस ठाणे हद्दीत हिंसा प्रभावित भागात कोणतीही संचार बंदीत कोणतीही ढील नसणार आहे. या पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी कायम असेल. शांती नगर, लखडगंज व यशोधरा नगरमध्ये दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान संचारबंदीत ढील दिली जाईल. चार नंतर पुन्हा संचारबंदी लागू असेल. उर्वरित 5 पोलीस ठाणे हद्दीतील संचारबंदी उठवली जाणार आहे.
नागपूर हिंसाचारात 60 वाहनांची तोडफोड
नागपूर हिंसाचारात 60 वाहनांची तोडफोड झाली असून एका घराचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून प्राथमिक माहिती समोर येत आहे. प्राथमिक सर्वेक्षणात 20 दुचाकी, 40 चारचाकीचे नुकसान झाले तर 2 क्रेन जाळण्यात आल्या आहेत. उड्डाणपुलाच्या कामासाठी असणाऱ्या क्रेन जाळण्यात आल्याने सुमारे 70 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा कंस्ट्रक्शन कंपनीने दावा केलाय. वाहनाचे पूर्ण नुकसान झाल्यास प्रति वाहन 50 हजार रुपये मिळणार आहे. तर अंशतः नुकसान झाल्यास प्रति वाहन 10 हजार मिळणार आहे. तर विम्याचा लाभ घेतल्यास शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार नाही, अशी माहिती समोर येत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

