Sharad Pawar: दिलीप वळसेंनी दादांच्या केबिनचं दार उघडलं, शरद पवारांनी कटाक्ष टाकताच अजित पवार..., पाहा व्हिडिओ
Sharad Pawar: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळीची बैठक सकाळी 10 वाजता बोलावण्यात आली होती. ही बैठक अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होती.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अन् उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज भेट झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात आज चर्चेचा विषय बनला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बंद केबिनमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांच्या पक्षांतराबाबत देखील चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आज झालेली ही भेट चर्चेत आली. आज पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळीची बैठक सकाळी 10 वाजता बोलावण्यात आली होती. ही बैठक अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होती. तर या नियामक मंडळावर अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे यांच्यासह अनेक नेते मंडळी संचालक म्हणून काम पाहतात.
नेमकं काय घडलं?
या बैठकीसाठी अजित पवार हे सकाळी 8.15 च्या आसपास बैठकीच्या ठिकाणी आले आणि त्यावेळी अजित पवारांनी उपस्थित नागरिकांची निवेदन स्वीकारली, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. तर त्याच दरम्यान शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आले असल्याचं अजित पवारांना समजलं. त्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बराच वेळ चर्चा देखील झाली. या दोघांच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली. हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. या दरम्यान शरद पवार हे बैठकीच्या ठिकाणी 9 वाजून 40 मिनिटांनी दाखल झाले. त्यावेळी दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील आणि दिलीप देशमुख यांनी शरद पवार यांचे स्वागत केले.
त्यावेळी शरद पवार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बघून म्हणाले, लवकर आलात का? त्यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले, हो साहेब, त्यानंतर शरद पवार हे दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत काही अंतर पुढे चालत गेल्यावर, अजित पवार हे उपाध्यक्षच्या केबिनमध्ये बसले होते. त्या केबिनच्या जवळ पोहोचताच, दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्या केबिनचा दरवाजा उघडला. त्यावर अजित पवार हे आतमध्ये काही व्यक्तीसोबत चर्चा करित होते. तर त्या केबिनमध्ये कोण आहे. हे शरद पवार यांनी काही सेकंद पाहिलं आणि ते पुढे गेले. त्या काही सेकंदांचा व्हिडिओ देखील कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
शरद पवारांचा कटाक्ष, अजितदादांनी हाताचा केला इशारा
हर्षवर्धन पाटील आणि इतर नेते पुढे चालत आले, त्यांच्यामागे दिलीप वळसे पाटील होते, त्यांनी अजित पवारांच्या केबिनचा दरवाजा उघडला. तितक्यात त्यांच्यामागे असलेले शरद पवार चालत पुढे आले, शरद पवार यांनी अजित पवार बसलेल्या केबिनकडे कटाक्ष टाकला. काही सेकंद ते स्थिरावले, मात्र आत न जाता पुढे निघाले. याच वेळी अजित पवारांनी हाताने केबिनच्या दिशेने जाण्यास सांगितले. दिलीप वळसे पाटील यांनी दरवाजा उघडताच शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एक नजरानजर झाली. मात्र, त्यानंतर पवारांनी पुढे गेल्याचं दिसून आले.
शरद पवारांसोबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठकीला जात असताना वळसेंनी दादांच्या केबिनचं दार उघडलं, पवारांनी कटाक्ष टाकला अन्..., पाहा व्हिडिओ#Sharadpawar #Ajitpawar #NCP pic.twitter.com/Pm6a8sUE9d
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) March 22, 2025
अजितदादा-पाटील भेटीवर राऊतांचा टोला
वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये बंद केबिनमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांमध्ये चर्चा देखील झाल्याची माहिती समोर येत आहे. आता अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हल्लाबोल केलाय. संजय राऊत म्हणाले की, त्यांचे उत्तम चाललेले असते. शिवसेनेतून आमचे जे काही लोक सोडून गेले आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्राशी त्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. आमच्या नाही तर आम्ही म्हणतो या राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला. आम्ही त्यांच्या आसपासही जाणार नाही. पण यांचे बरे असते, यांना एकत्र भेटण्यासाठी वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट असते, एकत्र भेटण्यासाठी विद्या प्रतिष्ठान असतं, त्यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते. आमच्याकडे असे काहीही नाही. त्यामुळे आमच्या काही भेटीगाठी कुणाशी होत नाही आणि होण्याची वेळ आली तरी देखील आम्ही टाळतो, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

