मनसेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा, शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, नेमकं काय बोलणार?
यंदाच्या मेळाव्याला विशेष राजकीय महत्त्व असून महापालिका निवडणुकीपासून ते सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai: राज्याच्या महापालिका निवडणुकासंदर्भात संघटनात्मक मोर्चा बांधणीला सुरुवात केलेल्या मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (GudhiPadva Melava) दादरच्या शिवाजी पार्कमध्ये 30 मार्चला होणाऱ्या मनसेच्या मेळाव्याला मुंबई पालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी मिळाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे राजकीय वर्तुळात साऱ्यांचे लक्ष आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेच्या 19 या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा राज ठाकरेंनी घेतला होता. यात महापालिकेसाठी जबाबदाऱ्या वाटत शड्डू ठोकल्याचे दिसले. (Raj Thackeray)
यंदाच्या मेळाव्याला विशेष राजकीय महत्त्व असून महापालिका निवडणुकीपासून ते सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मनसे सैनिकांची गर्दी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची पुढील राजकीय दिशा कोणती यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मेळाव्याचा रस्ता मोकळा, परवानगी मिळाली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा झालाय. दादरच्या शिवाजी महाराज मैदानात गेल्या 30 मार्चला होणाऱ्या मनसेच्या या मेळाव्याला मुंबई पालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी मिळाली आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या मनसैनिकांना राज ठाकरे संबोधित करणार आहेत. या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. दादरच्या शिवाजी पार्क होणाऱ्या या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडतात ही महत्त्वाचे ठरणार आहे .
संघटनात्मक मोर्चेबांधणीला सुरुवात
काही दिवसांपूर्वी कामचुकार पदाधिकाऱ्यांची हकलपट्टी करणार असल्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला होता. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या कामाचा लेखाजोखा तपासणार असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक मोर्चेबांधणी करण्यासाठी संरचना करण्यात येत असल्याचेही राज ठाकरे म्हणाले होते. या संघटनात्मक गोष्टीचे रिझल्ट निवडणुकीत दिसले पाहिजेत असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना मिळाव्यात सांगितले होते. आता मनसेची पुढची दिशा काय राहणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

