(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jobs Updates: आयटी क्षेत्रात भरती घटली, तर रिअल इस्टेटसह या क्षेत्रातील रोजगारात वाढ: सर्वे
Jobs: मागील महिन्यात, जून 2023 मध्ये आयटी क्षेत्रातील रोजगारात घट झाली असल्याचे एका सर्वेतून समोर आले आहे.
Jobs: आर्थिक मंदीचे सावट असताना रोजगार वाढीबाबतची (Jobs Growth) आकडेवारी समोर आली आहे. मागील महिन्यात, जून 2023 मध्ये आयटी क्षेत्रातील (IT Sector) रोजगारात घट झाली असल्याचे एका सर्वेतून समोर आले आहे. तर, ऑइल अँड गॅस, रिअल इस्टेट आणि फार्मा क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. या क्षेत्रात नोकरभरतीमध्ये अनुक्रमे 40 टक्के, 17 टक्के आणि 14 टक्के इतकी वाढ झाली आहे
जॉब पोर्टल नोकरीडॉट कॉमच्या 'नोकरी जॉबस्पीक'ने केलेल्या सर्वेत ही बाब समोर आली आहे. भारतातील व्हाइट-कॉलर जॉब्ससाठी जून 2023 मध्ये उत्तम स्थिती राहिली. भरतीच्या जाहिरातींची संख्या 2795 झाली. गेल्यावर्षी ती 2878 इतकी होती. मासिक आधारावर भरतीच्या जाहिराती दोन टक्क्यांनी घटल्या आहेत. टेक क्षेत्र आणि मेट्रो शहरांमधील व्हाइट कॉलर रोजगारांची संख्या कमी झाली आहे. तर विशेषत: नॉन-मेट्रो शहरामधील रिअल इस्टेट आणि ऊर्जा क्षेत्रांतील रोजगारांच्या संख्येने या घटीवर मात करत रोजगार बाजारपेठ स्थिर ठेवली असल्याचे सर्वेत म्हटले आहे.
आयटी क्षेत्रात भरती घटली
आयटी उद्योगामधील रोजगार चिंतेचा विषय म्हणून कायम राहिला. गेल्या वर्षाच्या जून महिन्याच्या तुलनेत यंदाच्या वर्षात नवीन रोजगारांमध्ये 31 टक्क्यांची घट झाली. नियुक्तीमधील ही घट प्रामुख्याने सर्व प्रकारच्या आयटी कंपन्यांमध्ये दिसण्यात आली. ज्यामध्ये जागतिक टेक कंपन्या, मोठ्या आयटी सर्व्हिस कंपन्या, तंत्रज्ञान-केंद्रित स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न्सचा समावेश होता. सर्व मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांतील नियुक्तीमध्ये घट झाली. बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि पुणे यांसारख्या आयटीवर अवलंबून असलेल्या मेट्रो शहरांना मोठा फटका बसला. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि सिस्टम अॅनालिस्ट्स यांसारख्या पूर्वापार पदांमध्ये घट दिसण्यात आली. तर सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट्स व एआय स्पेशालिस्ट्स यांसारख्या पोस्टच्या नियुक्तींवरील सकारात्मक ट्रेण्ड दाखवला. त्यामुळे इतर सर्वात टेक पदांसाठी नकारात्मक ट्रेण्ड कमी झाला.
ऑईल अॅण्ड गॅस, रिअल इस्टेट आणि फार्मा क्षेत्रात नोकर भरती
ऑईल अॅण्ड गॅस क्षेत्रातील रोजगारांमध्ये वाढ होण्याची काही कारणे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये जलद रिफायनरी विस्तारीकरण आणि वाढत्या देशांतर्गत, निर्यात मागणीची पूर्तता करण्यासाठी सहाय्यक पदांना जाते. प्रामुख्याने अहमदाबाद, मुंबई व दिल्ली एनसीआर येथे प्रमुख पदांसाठी अधिक नियुक्ती दिसून आली. यामध्ये एक्स्प्लोरेशन इंजिनिअर्स, रिफायनरी ऑपरेशन्स मॅनेजर्स आणि हेल्थ, सेफ्टी अॅण्ड एन्व्हायरोन्मेंट स्पेशालिस्ट्स यांचा समावेश आहे. या क्षेत्रातील नियुक्तीमध्ये मध्यम-स्तरीय अनुभव असलेल्या व्यावसायिकांना प्राधान्य देण्यात आले.
रिअल इस्टेट क्षेत्राने गेल्या वर्षाच्या जून महिन्याच्या तुलनेत नवीन रोजगारांमध्ये 17 टक्के वाढ झाली असल्याचे दिसून आले. पायाभूत सुविधा विकास आणि व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये वाढीसह मुंबई, चेन्नई प्रॉपर्टी अप्रेझर्स, कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजर्स आणि रिअल इस्टेट कन्सल्टण्ट्स यांसारख्या पदांसाठी प्रमुख रोजगार हब्स ठरले.
तसेच, फार्मा क्षेत्राने गेल्या वर्षाच्या जून महिन्याच्या तुलनेत नवीन रोजगारांमध्ये 14 टक्क्यांची वाढ केली. औषध विभागामध्ये स्थिर संशोधन आणि विकास विभागातील गुंतवणूकांमुळे चालना मिळाल्याने अहमदाबाद, चेन्नई व पुणे बायोटेक्नॉलॉजिस्ट्स, क्लिनिकल रिसर्च अॅनालिस्ट्स व क्वॉलिटी अशुरन्स स्पेशालिस्ट्ससाठी पसंती देण्यात आली.
ऑटोमोबाइल, हॉस्पिटॅलिटी आणि बँकिंग या इतर काही क्षेत्रांमध्ये गेल्या वर्षाच्या जून महिन्याच्या तुलनेत नवीन रोजगारांमध्ये अनुक्रमे 12 टक्के, 11 टक्के आणि 11 टक्के वाढीसह सकारात्मक ट्रेण्ड दिसून आला.