Gautam Adani : अदानी ग्रुपचे एकाच वर्षात 3.4 लाख कोटींचे नुकसान, 'या' कंपनीला सर्वाधिक फटका
Gautam Adani Group : गेल्या वर्षभरात अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण झाली. त्याचे मार्केट कॅप 2.90 लाख कोटी रुपयांवरून 1.46 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे.

मुंबई : गेल्या काही वर्षभरापासून सातत्याने यशाची कमान चढणाऱ्या अदानी ग्रुपसाठी (Gautam Adani Group) 2024-2025 हे आर्थिक वर्ष मात्र काहीसं खास नसल्याचं दिसून आलं. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये (Adani Shares) गेल्या वर्षीच्या तुलनेत 21 टक्क्यांनी घट झाली आहे. म्हणजेच एकूण बाजार भांडवलात 3.4 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बाजारातील चढउतार, नियामक छाननी आणि समूहावर झालेले काही आरोप हे या घसरणीचे कारण असल्याचे मानले जात आहे.
कोणत्या कंपनीचे किती नुकसान?
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 28 मार्च 2024 ते 21 मार्च 2025 दरम्यान, अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये (Adani Green Energy Shares) सर्वात मोठी घसरण झाली. त्याचे मार्केट कॅप 2.90 लाख कोटी रुपयांवरून 1.46 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे. म्हणजेच जवळपास निम्मे मार्केट कॅप बुडाले आहे. त्याच वेळी, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स देखील 27 टक्क्यांनी घसरले आहेत, ज्यामुळे 94,096 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
अदानी पोर्ट्स आणि SEZ चे मार्केट कॅप देखील 11.40 टक्क्यांनी कमी झाले आहे. ती किंमत 33,029 कोटी रुपये इतकी आहे. अदानी टोटल गॅस आणि अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या शेअर्समध्येही 31.84 टक्के आणि 18.95 टक्के घसरण झाली आहे.
सिमेंट कंपन्यांबद्दल बोलायचे झाले तर एसीसी आणि अंबुजा सिमेंटचे शेअर्स 23.10 टक्के आणि 15.92 टक्क्यांनी घसरले आहेत. तर अदानी समूहाची मीडिया कंपनी असलेल्या एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये 41.58 टक्क्यांनी मोठी घसरण झाली आहे.
अदानी समूहाचे शेअर्स का पडले?
FY25 मध्ये अदानी समूहाच्या शेअर्समध्ये (Adani Group Shares) घसरण होण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये, भारतीय शेअर बाजारावर असलेला स्थूल आर्थिक दबाव, शहरी खर्चात कपात आणि ट्रम्प यांच्याकडून लावण्यात येणाऱ्या टॅरिफमुळे निर्माण झालेल्या जागतिक तणावाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय अक्षय ऊर्जा आणि गॅस क्षेत्रातील समस्यांचाही अदानी समूहावर परिणाम झाला आहे. तर विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (FIIs) मोठ्या प्रमाणात विक्रीचा परिणाम अदानी समूहाच्या एकूण सहा कंपन्यांवर झाला आहे.
Disclaimer: या ठिकाणीचा कन्टेंट हा केवळ माहितीसाठी दिला जात आहे. बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ञांचा सल्ला घ्या. ABP माझा कधीही कोणालाही येथे पैसे गुंतवण्याचा सल्ला देत नाही.
ही बातमी वाचा:


















