एक्स्प्लोर
Advertisement
BLOG | गोष्ट एका डॉक्टरांच्या फोटोची...
सामान्य माणसाच्या जीवासाठी आपला प्राण पणाला लावणारा देव, अल्लाह, गॉड कुणी पाहिलाय का? मी पाहिलाय! असे असंख्य डॉक्टर रेलीगा आपल्या भवताली आहेत, ते काय सांगताहेत ते ऐकले पाहिजे आणि त्यांच्या सूचनांचे पालन आपण केलेच पाहिजे. संकटकाळापुरती त्यांना देवत्वाची चौकट देऊन चालणार नाही, ती कृतघ्नता होईल!
सोबतच्या छायाचित्राला एक गौरवशाली इतिहास आहे. नॅशनल जिओग्राफिकने 1987 चे सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून याची निवड केली होती. कारण या छायाचित्रामागची पार्श्वभूमी होतीच तशी. छायाचित्राच्या केंद्रस्थानी एक डॉक्टर दिसतात, त्यांची भावमुद्रा गंभीर आहे. रुग्णाच्या पॅरामीटर्सवर त्यांची नजर खिळलेली आहे. तसबिरीच्या मधोमध एका स्ट्रेचरवर निद्रिस्त अवस्थेतील वयस्कर रुग्ण दिसतो. सर्व बाबी निरखून पाहिल्या तर लक्षात येतं की हे छायाचित्र एका ऑपरेशन थिएटरमधलं आहे. ऑपरेशन झालेला रुग्ण कदाचित अजूनही शुद्धीवर आलेला नसावा आणि त्याच्या बाजूस बसलेले डॉक्टर त्याच्या वैद्यकीय मानकांवर कटाक्षाने लक्ष ठेवून आहेत. स्ट्रेचरभोवती केबल्सचं जाळं आहे. विविध वैद्यकीय सामग्री नजरेस पडते. छायाचित्राच्या उजव्या कोपऱ्यात एक सर्जन बसल्या जागीच झोपी गेलेले दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा खूप काही सांगून जातो. एखादी मोठी जिकिरीची शस्त्रक्रिया पार पाडल्याची लक्षणं या छायाचित्रातून आपल्याशी बोलत राहतात. जगातील बोलक्या छायाचित्रात आजही याची गणना होते...
टडेवुश झिकेवेट्स यांचं हृद्य कमजोर झालं होतं आणि त्यांना हृदयविकाराचे दोन धक्के येऊन गेले होते, त्यांच्या हृदयाचे व्हॉल्व काम करत नव्हते. त्यावेळी त्यांचं वय होतं 56 वर्षांचं. डॉक्टर झिबिग्न्यू रेलीगा यांच्याकडे ते उपचार घेत होते. रेलीगा यांच्या मनात काही तरी वेगळंच घाटत होतं आणि नियतीने त्यांना साथ दिली. ब्रेनडेड होऊन कोमामध्ये गेलेल्या एका तरुणाची माहिती त्यांना मिळाली. रेलीगांनी तत्काळ त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यांना त्या तरुणाचं हृदय हवं होतं, आपल्या वृद्ध रुग्णासाठी. त्या तरुणाचे कुटुंबीय यास आनंदाने तयार झाले. कारण हृदयदानाची त्यांच्या देशातील ती पहिली घटना होती. पोलंडमधला ऐतिहासिक दाता होण्याचा मान त्या तरुणास मिळाला.
या बातमीची कुणकुण पोलिश प्रसारमाध्यमांना लागली आणि पोलंडमध्ये एकच गदारोळ उडाला. कॅथॉलिक चर्चेसमधून कठोर टीका केली जाऊ लागली. कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव असूनदेखील लोकांनी चर्चच्या निर्देशांना मूक संमती दिली. देशातील अनेक मोठ्या डॉक्टर्सनी आणि नावाजलेल्या इस्पितळांनी डॉक्टर रेलीगांना भीती घातली की याबद्दल तुमचा वैद्यकीय परवाना सरकारकडून रद्द होऊ शकतो. रेलीगा प्रचंड दडपणाखाली आले मात्र बधले नाहीत. ते आणि त्यांचा रुग्ण टडेवुश झिकेवेट्स दोघेही ठाम होते.
टडेवुशना ठाऊक होतं की आपलं आयुष्य आता जेमतेम काही महिन्यांचं उरलं आहे, असं नी तसं आपण लवकरच इहलोकातून प्रस्थान करणार आहोत. तेव्हा रेलीगांच्या प्रयोगात त्यांना आपला वापर करु दिला तर देशाचे भलेच होईल नाहीतर आपला मृत्यू होईल, जो काही दिवसांनी होणारच आहे! या विचारांमुळे ते आपल्या डॉक्टरांच्या हरेक निर्णयात सकारात्मक सामील होते. सगळ्यांनी टीकेचा स्वर लावल्यावर रेलीगांच्या समोर नवीन अडचणी उभ्या राहिल्या. या शस्त्रक्रियेसाठी लागणारी काही महत्वाची सामग्री त्यांच्याकडे नव्हती. शिवाय त्यांची किंमतही त्यांच्या आवाक्याबाहेरची होती. रेलीगा हरले नाहीत, त्यांनी सर्व मार्ग चोखाळायचे ठरवले. त्यांनी चक्क पोलंडमधील माफियांना गाठलं!
एक डॉक्टर आपल्या रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी खुन्यांना पैसे मागतोय हे चित्र त्या देशाला अधिकच गोंधळात टाकून गेलं. माफियांच्या टोळीस मात्र याचं समाधान वाटलं. आपण एक सत्कृत्य करत आहोत याचा आनंद त्यांना या निमित्ताने अनुभवता आला. त्यांनी रेलीगांना हवे तितके पैसे देऊ केले. अवघ्या काही दिवसात रेलीगांनी इस्पितळ अद्ययावत करुन घेतलं. रेलीगांच्या पाठीशी 24 वर्षांचा अनुभव होता. 1963 मध्ये त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं होतं. 15 ऑगस्ट 1985 रोजी त्यांनी पोलंडमधली पहिली हृदयशस्त्रक्रिया केली होती. आता त्यांना हृदयरोपण करायचं होतं. ब्रेन डेड होऊन कोमात गेलेल्या तरुणाचं हृदय काढून ते वयस्कर टडेवुशच्या शरीरात बसवायचं होतं. महाकठीण काम होतं आणि वेळ वेगाने घटत होता. अधिक काळ न दवडता रेलीगांनी शस्त्रक्रियेची तारीख निश्चित केली, 9 नोव्हेंबर 1987!
भल्या पहाटेस वॉर्सावरुन झब्रजला रेलीगांच्या इस्पितळात हृदय आणले गेले. सकाळी सुरु झालेली शस्त्रक्रिया तब्बल 23 तास चालली. रेलीगा आणि त्यांचे सहाय्यक डॉक्टर्स अशी पाच जणांची टीम यासाठी राबली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, थकलेले सर्जन बसल्या जागी तृप्ततेने निद्राधीन झाले. डॉक्टर रेलीगा मात्र जागे होते. रुग्णाच्या तब्येतीत काही उतारचढाव होतोय का यावर ते लक्ष ठेवून होते. त्याच्या सर्व पॅरामीटर्सवर डोळ्यात तेल घालून पाहत होते. नेमक्या याच वेळी फोटोजर्नलिस्ट जेम्स स्टॅनफिल्ड यांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला आणि पुढे तो एक ऐतिहासिक क्षण ठरला.
या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर रेलीगांची देशभरात वाहवा झाली. नंतर त्यांनी सामाजिक राजकीय क्षेत्रात पाऊल टाकलं. ते तीन वेळा सिनेटर झाले. पोलिश आरोग्यमंत्रीपदीही आरुढ झाले. 2005 मध्ये तर त्यांनी अध्यक्षपदाचीही निवडणूक लढवली. त्यांना बऱ्यापैकी मते पडली पण ते निवडून येऊ शकले नाहीत. त्या प्रसिद्ध शस्त्रक्रियेनंतर 22 वर्षांनी 8 मार्च 2009 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. फुफ्फुसाच्या क्षयरोगाने त्यांचं निधन झालं. अखेरच्या काळात धूम्रपानाविरोधात मोठी मोहीम त्यांनी राबवली होती. पोलिश आरोग्यव्यवस्थेचे ते मानबिंदू झाले.
शस्त्रक्रियेनंतर 25 वर्षांनी टडेवुश त्या गोल्डन फोटोसह माध्यमात झळकले होते
त्यांनी ज्यांची शस्त्रक्रिया केली होती ते टडेवुश झिकेवेट्स हे मात्र ठणठणीत राहिले. डॉक्टर रेलीगांच्या मृत्यूनंतर अनेक वाहिन्यांनी त्यांची मुलाखत प्रसिद्ध केली. शस्त्रक्रियेनंतर तब्बल 30 वर्षांनी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. ज्या रेलीगांनी त्यांचं हृदयरोपण केलं होतं, त्यांचं हृद्य धडकायचं थांबलं होतं तरी टडेवुश यांचं हृदय त्यानंतर 8 वर्षे धडधडत राहिलं. आपल्या जिवलगाचे अवयव दान देणारे एक कुटुंब, जवळ पायाभूत सुविधा नसतानाही केवळ प्रबळ इच्छाशक्ती व वैद्यकीय ज्ञानावरचा विश्वास असणारा एक डॉक्टर आणि प्रयोगासाठी आपलं शरीर वापरण्यास कसलीही हरकत न घेता खुशीने तयार झालेला एक जिगरबाज वृद्ध रुग्ण या तिघांची दास्तान आपल्याला खूप काही शिकवून जाते. सध्याच्या काळात सगळेचजण अस्वस्थ झाले आहेत. उद्याचा दिवस काय घेऊन येईल याची कुणालाच शाश्वती नाही. आपल्या डॉक्टरांवर भरवसा ठेवूनच आपल्याला वागलं पाहिजे कारण तो एकच व्यक्ती आहे जो आपल्याला जीवनदान देऊ शकतो. प्रसंगी तो आपल्या प्राणाची बाजीही लावतो!
कधी कुठल्याही जातीधर्माच्या देवाने सामान्य माणसाच्या जीवासाठी आपला प्राण पणाला लावणारा देव, अल्लाह, गॉड कुणी पाहिलाय का? मी पाहिलाय! असे असंख्य डॉक्टर रेलीगा आपल्या भवताली आहेत, ते काय सांगताहेत ते ऐकले पाहिजे आणि त्यांच्या सूचनांचे पालन आपण केलेच पाहिजे. संकटकाळापुरती त्यांना देवत्वाची चौकट देऊन चालणार नाही, ती कृतघ्नता होईल! त्यांना कुणी नावं ठेवत असेल तर त्याने आधी स्वतःच्या अंतरंगातही नक्की डोकावून पाहावं, नैतिकतेच्या कसोटीवर तुलना करावी. तेच त्राते आहेत. त्यांना उचित सन्मान दिलाच पाहिजे...
- समीर गायकवाड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
शिक्षण
निवडणूक
Advertisement