Maharashtra Budget 2025: नक्षलग्रस्त गडचिरोलीची ओळख पुसली जाणार! अर्थसंकल्पात अजित पवारांकडून घोषणांचा पाऊस, विदर्भाच्या वाट्याला काय?
Maharashtra Budget 2025: अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (10 मार्च) विधिमंडळात राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केलाय. अर्थसंकल्पात विदर्भाच्या वाट्याला नेमकं काय? हे जाणून घेऊ.

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (10 मार्च) सोमवारी विधिमंडळात राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025) सादर केला. राज्याच्या 11वा अर्थसंकल्पात अजित पवारांकडून (Ajit pawar) अनेक योजनांची घोषणा करत सध्या सुरू असलेल्या विकासकामांचा लेखाजोखा(Budget) अर्थमंत्र्यांनी मांडला आहे. अजित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह सर्वच महापुरुषांना वंदन करुन महाराष्ट्र सरकारचा यंदाचा 2025-26 अर्थसंकल्प वाचण्यास सुरुवात केली. यावेळी मी माझ्या आयुष्यातील 11वा अर्थसंकल्प सादर करत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटलंय.
आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवारांनी महाराष्ट्राचा विकास, पायाभूत सुविधा, शासनाच्या विविध योजना, परकीय गुंतवणूक, आद्यौगिक क्षेत्रातील वाढ यांसह विविध विषयांवर भाष्य केलं. सोबतच काही कवितांचा आधार घेत त्यांनी भविष्यातील आर्थिक तरतुदींवर भाष्य केलंय. अशातच या अर्थसंकल्पात विदर्भासाठीही अर्थमंत्र्यांनी काही घोषणा केल्या आहेत. त्यामुळे विदर्भाच्या वाट्याला नेमकं काय? हे जाणून घेऊ.
गडचिरोली जिल्ह्यासाठी मोठ्या घोषणा, 500 कोटी रुपयांची गुंतवणूक
एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता “स्टील हब” म्हणून उदयास येत आहे. दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्याकरिता 21 हजार 830 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून 7 हजार 500 रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळणासाठी खनिकर्म महामार्गांचे जाळे विकसित केले जात असून त्याकरिता पहिल्या टप्प्यात सुमारे 500 कोटी रुपये किंमतीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
- वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी हा 760 किलोमीटर लांबीचा 86हजार 300 कोटी रुपयांच्या महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन कार्याची कामे प्रगतीपथावर आहे.
- मुंबई, नागपूर व पुणे महानगरांतील नागरिकांना पर्यावरणपूरक, शाश्वत, विनाअडथळा व वातानुकुलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत.
-नागपूर मेट्रोचा 40 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात 6 हजार 708 कोटी रुपये किंमतीचे 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे.
- नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खाजगी सहभागातून श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे.प्रवासी आणि मालवाहतूक क्षमतेत त्यामुळे वृध्दी होईल. विदर्भाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल.
- गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12 हजार 332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून हा प्रकल्प जून, 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सन 2025-26 करिता 1 हजार 460 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे.
- शासनाने महत्वाकांक्षी तापी महापुनर्भरण हा 19 हजार 300 कोटी रुपये किंमतीचा सिंचन प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले आहे.
या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
- अमरावतीतील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून तेथून 31 मार्च 2025 पासून प्रवासी सेवा सुरु करण्याचे नियोजन आहे. गडचिरोली येथील नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुरु आहेत. अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
हे ही वाचा
























