Maharashtra Budget 2025 : कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना, रामकुंड, काळाराम मंदिर, गोदाकाठ विकासासाठी अजितदादांची मोठी घोषणा, उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय?
Maharashtra Budget 2025 : अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी अकरावा अर्थसंकल्प सादर केला. यात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी विविध घोषणा करण्यात आल्या आहेत.

Maharashtra Budget 2025 : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (दि. 10 मार्च) रोजी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी अकरावा अर्थसंकल्प सादर केला. यात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मोठी घोषणा केली आहे. शिर्डी विमानतळ, समृद्धी महामार्ग, नार-पार प्रकल्पाबाबत अजित पवारांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची घोषणा
सन 2017 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नमामि गोदा अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करून त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नाशिक येथे रामकालपथ विकास प्रकल्पांतर्गत रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदाकाठ परिसरातील पर्यटनाचा विकास करण्यासाठी 146 कोटी दहा लाख रुपयांची कामे खाती घेण्यात येत आहे.
शिर्डी विमानतळासाठी 1 हजार 367 कोटी रुपये
शिर्डी विमानतळाच्या 1 हजार 367 कोटी रुपये किंमतीच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली असून ती कामे सुरु आहेत. सन 2021 मध्ये शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. नाईट लॅडिगची सुविधाही लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
समृध्दी महामार्गाचे 99 टक्के काम पूर्ण
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे 99 टक्के काम पूर्ण झाले असून त्यासाठी 64 हजार 755 कोटी रुपये खर्च झाला आहे. इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल. या महामार्गालगत अॅग्रो-लॉजिस्टिक हब विकसित केले जाणार असून त्यात कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग व निर्यात हाताळणी केंद्राच्या प्रमुख सुविधा पुरविण्यात येतील. याचा लाभ प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाबाबत घोषणा
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाव्दारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील 49 हजार 516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 7 हजार 500 कोटी रूपये आहे. दमणगंगा-गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील 9 हजार 766 हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल. नाशिक जिल्ह्यातील 2 हजार 987 हेक्टर क्षेत्रालाही यामुळे सिंचनाचा लाभ होईल. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 2 हजार 300 कोटी रूपये आहे.
तापी महापुनर्भरण प्रकल्प
शासनाने महत्वाकांक्षी तापी महापुनर्भरण हा 19 हजार 300 कोटी रुपये किंमतीचा सिंचन प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले आहे. या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
आणखी वाचा






















