Rangpanchami 2022 : राज्यातील प्रमुख देवस्थानांमध्ये रंगपंचमीची धूम, भविकांचा उत्साह शिगेला
राज्यातील प्रमुख देवस्थानांमध्येही कोरोनानंतरच्या रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतोय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदीरात दोन वर्षानंतर पहिल्यांदाच पारंपरिक पद्धतीने रंगोत्सव साजरा करण्यात आला. दुग्धाभिषेक करुन देवीला शुभ्र रंगाचे वस्त्र नेसवण्यात आले. त्यानंतर सुवर्णालंकार घालून देवीची आरती करण्यात आली. देवीला गुलाबी रंग लावल्यानंतर सर्वत्र रंगपंचमीला सुरुवात झाली. तिकडे सावळ्या विठुरायांच्या पंढरीत कोरोनाच्या २ वर्षांनंतर रंगपंचमी साजरी करण्यात आली.. विठ्ठलाच्या मूर्तीला रंग लावून या सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी पर्यावरणपूरक कोरड्या रंगांची रंगपंचमी साजरी करण्यात आली. या सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी झाले. साईनगरी शिर्डीतही रंगपंचमीची लगबग पाहायला मिळतेय. शिर्डीत साईंच्या सुवर्ण रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. दोन वर्षांनंतर प्रथमच सुवर्णरथ मिरवणूक निघणार आहे.