India Tour of South Africa 2021: ठरलं! दक्षिण आफ्रिकेचा दौरा होणारच, पण टी-20 मालिकेबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय
India Tour of South Africa 2021: या दौऱ्यावर भारतीय संघ केवळ कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
India Tour of South Africa 2021: भारतीय क्रिकेट संघांच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात असताना महत्वाची माहिती समोर आलीय. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र, या दौऱ्यावर भारतीय संघ केवळ कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. तर, टी-20 मालिकेच्या तारीख नंतर ठरवली जाईल, असं जय शाह यांनी एएनआयला सांगितलंय.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात बदल करण्यात आल्याची माहिती दिलीय. भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार असल्याचं त्यांनी शनिवारी स्पष्ट केलंय. या दौऱ्यात भारतीय संघ फक्त तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. तर, टी-20 मालिकेसंदर्भात नंतर तारिख ठरवली जाईल, असंही त्यांनी म्हटलंय. या दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफिक्रेविरुद्ध चार सामन्यांची टी-20 मालिका खेळणार होता.
दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंट ओमायक्रॉननं संपूर्ण जगाला चिंतेत टाकलंय. यामुळं भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासंदर्भात अनेक तर्क वितर्क लावले जात होते. ओमायक्रॉन प्रकारामुळं दररोज कित्येक रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत? या सर्व गोष्टींवरही बीसीसीआय रोज लक्ष ठेवून आहे.
भारत तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी, भारतानं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. भारतानं नुकताच इंग्लंडचा दौरा केलाय. त्यानंतर भारतीय कॅम्पमध्ये कोरोनाचे प्रकरण समोर आल्यानंतर मँचेस्टरमधील पाचवा कसोटी सामना पुढे ढकलावा लागला होता. हा कसोटी सामना 2022 मध्ये खेळला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-