Turkiye Earthquake: तुर्कीमध्ये 10 भारतीय अडकले, एक जण बेपत्ता, परराष्ट्र मंत्रालयानं दिली माहिती
Turkey Syria Earthquake : तुर्की आलेला महाविनाशकारी भूकंपाला दोन दिवस झालेत. पण, देशात अजूनही बचावकार्य सुरु आहे.

Turkey Syria Earthquake : तुर्की आलेला महाविनाशकारी भूकंपाला दोन दिवस झालेत. पण, देशात अजूनही बचावकार्य सुरु आहे. तुर्कीच्या याच विनाशकारी घटनेनंतर भारतानंही तातडीनं मदत जाहीर केली. बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या टीम्सही धाडल्या. त्यांनी बचावकार्यंही सुरु केलं. तुर्कीतल्या विध्वंसक भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. आतापर्यंत मृताची संख्या दहा हजारांच्या आसपास गेली आहे. दोन दिवसानंतरही तुर्कीमध्ये बचावकार्य सुरु झाले आहे. तुर्कीत दहा भारतीय अडकले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं याबाबतची माहिती दिली आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज पत्रकार परिषद घेत तुर्की आढललेल्या भारतीयांबद्दल माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय वर्मा म्हणाले की, तुर्कीमध्ये दहा भारतीय अडकले आहेत. ते सध्या सुरक्षित आहेत. पण एक भारतीय अद्याप बेपत्ता आहे. तुर्कीच्या अडाना येथे भारताने एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
तुर्कीत बेपत्ता असलेल्या भारतीयांचा शोध सुरु आहे. तो बेपत्ता झालेला भारतीय बेंगलोर येथील आहे. आम्ही त्याच्या कुटुंबियाच्या संपर्कात असल्याचं संजय वर्मा यांनी सांगितलं. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते संजय शर्मा म्हणाले की, तुर्कीत जवळपास तीन हजार भारतीय राहतात. त्यांच्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केलाय. तिथं आतापर्यंत 75 जणांचे कॉल आलेले आहेत. याशिवाय भारतीयांना विमानांमधून मदत पाठवण्यात येत आहे. त्यांच्यासाठी सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत.
अजूनही तुर्की सावरलेलं नसून चहुकडे मृतदेहांचा खच दिसून येतोय. याठिकाणी शिपिंग कंटेनरच्या क्षेत्रातही मोठं नुकसान झालं आहे. भूकंपामुळे रस्त्याशेजारील इमारती, घरंही कोसळली. तुर्कीत सर्वाधिक विध्वंस पाहायला मिळाला. प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन पळत होता. तुर्कीत भूंकपाच्या तीव्र धक्क्यांमुळे रस्ते खचले आहेत. रस्त्यांवर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. 250 हून अधिक इमारती कोसळल्यात. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकलेत. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की लोकांना घरातून सुरक्षित स्थळी जाण्याचाही वेळ मिळाला नाही. त्यामुळे अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेत. तुर्की अन् सीरियातील भूकंपाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तुर्कीमधील भूकंपाची दृश्य पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
तुर्की भूकंपातील मृतांचा आकडा 20 हजारांच्या आसपास पोहोचण्याची भीती : WHO
डब्ल्यूएचओनं तुर्की आणि सीरियामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओनं तुर्की आणि सीरियामध्ये 20 हजारांहून अधिक लोक मारले जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. इतकंच नाहीतर दोन्ही देशांतील 2.3 कोटी लोकांना याचा फटका बसू शकतो, असंही जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
