आनंदवार्ता! जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित 65 गावांना सिंचनाचा लाभ मिळणार, म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेचे काम अखेर सुरू
जत पूर्व भागातील 65 गावांसाठी एक हजार 928 कोटी रुपये खर्चाच्या विस्तारित म्हैसाळ म्हणजेच जत उपसा सिंचन योजनेस राज्य शासनाने मंजुरी दिली होती.

सांगली: जत तालुक्यातील (Sangli News) पाण्यापासून वंचित 65 गावासाठी आनंदाची बातमी आहे. 65 वंचित गावांना सिंचनाचा लाभ देण्यासाठी प्रस्तावित असलेल्या म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेचे काम अखेर सुरू करण्यात आलेय. जत पूर्व भागातील 65 गावांसाठी एक हजार 928 कोटी रुपये खर्चाच्या विस्तारित म्हैसाळ म्हणजेच जत उपसा सिंचन योजनेस राज्य शासनाने मंजुरी दिली होती. कामाच्या पहिल्या टप्प्याचे 981 कोटी 60 लाख 92 हजार रुपयांचे कामास सुरुवात झाली आहे.
ज्या भागातून ही योजना जाणार त्या मार्गावर पाईपचा कार्यक्षेत्रावर पुरवठा सुरु करण्यात येतोय. पाणी द्या अन्यथा कर्नाटकात जाऊ असा इशारा दिल्याने या भागातील सिंचन योजनेचे काम सुरु करण्यचे सरकारने आश्वासन दिले होते. या म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून 57 किलोमीटर अंतरापर्यत पाणी पोचविले जाणार आहे. म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक तीनच्या संतुलन जलाशयांमधून पाणी उचलून एकूण 57 किलोमीटर अंतरावर असलेल्या जत तालुक्यातील मौजे येळदरी पर्यत जवळपास 740 मीटर उंचीवर पाणी पोचविले जाणार आहे.या योजनेचे काम 2 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजित आहे.
सहा टीएमसी पाण्याची तरतूद
मूळ म्हैसाळ योजनेतील टप्पा क्रमांक तीन म्हणजे मिरज तालुक्यातील बेडग येथून थेट पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठी सहा टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे. त्यातून 65 गावांतील 50 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येईल. यासाठी शासनाने 1 हजार 928 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 981 कोटी 60 लाख 92 हजारांच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली होती. यामध्ये 1500 मिमी व्यासाची एम एस पाईप व जोड प्रवाही नालिकांसाठी 1700 मिमी व्यासाची PCCP पाईप वापरण्यात येणार आहेत. सदरच्या पाईप या मिरज, कवठेमंकाळ तालुक्यातून शेवटी जत तालुक्यापर्यंत जाणार आहेत.
जत तालुक्यापर्यंत पाणी जाणार
मूळ म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक तीनच्या संतुलन जलाशयांमधून पाणी उचलून एकूण 57 किलोमीटर अंतरावर जत तालुक्यातील मौजे येळदरी येथे भूतलांक 740 मीटर उंचीवर पाणी पोहोचविले जाणार आहे. मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यातून जत तालुक्यापर्यंत जाणार आहेत. या नलिका कामाची मौजे आरग व लोणारवाडी येथे सुरुवात करण्यात आलेली आहे.
हे ही वाचा :
सांगली महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून निविदा मॅनेज करण्याचा प्रयत्न; मनपा आयुक्तांची 'त्या' 10 अधिकाऱ्यांना नोटीस अन् सर्व कामेही रद्द
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
