Shivsena : उद्धव ठाकरेंच्या आदेशाने सांगली जिल्ह्यातील शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर, ग्रामीण जिल्हाप्रमुखपदी अभिजित पाटील यांची निवड
उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सांगली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे.

Shivsena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सांगली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे. ग्रामीण जिल्हाप्रमुख शिवाय उपजिल्हाप्रमुख, उपजिल्हा संघटक, तालुकाप्रमुख, तालुका संघटक, शहर संघटक या पदावर देखील शिवसैनिकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत बरीच पडझड सुरू झाली. एकीकडे ठाकरे यांनी दिलेला राजीनामा, महाविकास आघाडी सरकारचं कोसळणे आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून ते शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा ठोकण्यापर्यत ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद गेला आहे.
दुसरीकडे ठाकरे गटाचे काही शिवसैनिक, जिल्हाप्रमुख शिंदे गटात सामील होत असल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधील अनेक पदे रिक्त होत आहेत. सांगली जिल्ह्यात शिवसेनेचे ग्रामीण आणि शहरी असे दोन जिल्हाप्रमुख होते. ग्रामीण जिल्हाप्रमुख इस्लामपूरचे आनंदराव पवार तर शहर जिल्हाप्रमुख संजय विभूते होते.
यातील ग्रामीण जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे असताना देखील आपल्या भावावर, कार्यकर्त्यांवर मोक्काची कारवाई झाली. शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना देखील आपल्यावर अन्याय झाला असे म्हणत शिंदे गटात सहभागी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आनंदराव पवार यांचा उल्लेख करत ते माझ्याकडं येऊन कसा माझ्यावर अन्याय झाला हे रडून सांगत होते हे भर अधिवेशनात सांगितले.
त्यामुळे आनंदराव पवार यांना बळ आले शिवाय त्याची शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख पदी देखील निवड करण्यात आली. त्यामुळे ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख पद रिक्त होते. या पदावर अभिजित पाटील यांची निवड करण्यात आली. शिवाय उपजिल्हाप्रमुख, उपजिल्हा संघटक, तालुकाप्रमुख, तालुका संघटक, शहर संघटक या पदावर देखील नियुक्ती करण्यात आलीय.
पद, नाव, कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे
- जिल्हाप्रमुख : अभिजित पाटील (विधानसभा - ईश्वरपूर, शिराळा, पलूस-कडेगाव)
- उपजिल्हाप्रमुख : गौरीशंकर भोसले ( खानापूर विधानसभा)
- उपजिल्हा संघटक : संतोष पाटील (सांगली विधानसभा शहर)
- तालुकाप्रमुख : पांडुरंग (दादा) भगत ( खानापूर पूर्व तालुका),
- राज लोखंडे (खानापूर पश्चिम तालुका)
- सुभाष जगताप (आटपाडी पूर्व तालुका)
- मोहन देशमुख (आटपाडी पश्चिम तालुका)
- नागनाथ मोटे (जत पूर्व तालुका)
- विशाल चव्हाण (पलूस तालुका)
- तालुका संघटक : महेश गव्हाणे (मिरज पश्चिम)
- शहर संघटक : हरिदास पडळकर (सांगली शहर)
- अमोल कांबळे (सांगली शहर)
- अरूण बाबर (सांगली शहर)
- अभिजित शिंदे (सांगली शहर)
- शहर समन्वयक : प्रसाद रिसवडे, सांगली शहर






















