धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
पुसद शहरातील वाशिम रोड वरील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये प्रकाश काळे या शेतकऱ्याने आपले दीडशे क्विंटल सोयाबीन पोते ठेवले होते.

वाशिम : केंद्र सरकारने सोयाबिन खरेदीसाठी आणखी 24 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. मात्र, सोयाबीन (Soyabin) खरेदीच्या शेवटच्या दिवशी वाशिम सोयाबीन केंद्रावर एका शेतकऱ्याच्या मुलीला ताटकळत ठेवत रात्री उशिरापर्यंत त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाशिमधील (Washim) एका शेतकऱ्याच्या मुलीला स्वतःचे सोयाबीन पोते घेण्यासाठी रात्र होईपर्यंत ताटकळत ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी, पुसद वखार महामंडळाचे साठा निरीक्षक महेश पंजाबराव गिरी यांचा प्रतापामुळे शेतकऱ्यावर अन्याय होऊन आर्थिक फटका बसला आहे. तसेच, एका महिलेला मुद्दामहून ताटकळत ठेवल्याने संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी, दोषी असलेल्या साठा अधीक्षक महेश गिरी व सतीश जाधव यांचेवर कठोर कारवाईसाठी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना शेतकरी कन्या नेहा काळे यांनी तक्रारीतून मागणी केली आहे. तर, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
पुसद शहरातील वाशिम रोडवरील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये प्रकाश काळे या शेतकऱ्याने आपले दीडशे क्विंटल सोयाबीन पोते ठेवले होते. 6 फेब्रुवारी रोजी सोयाबीन खरेदीची नाफेड मार्फत शेवटची तारीख असल्याने त्यांची मुलगी ही सोयाबीन पोते घेण्याकरिता मालवाहू वाहनाने गोडाऊनला गेली होती. मात्र, साठा अधीक्षक महेश गिरी यांनी वेळकाढू धोरण अवलंबले व असभ्य वर्तवणूक केली. तसेच 7 फेब्रुवारी रोजी तुमचे माल नाफेड मार्फत खरेदी करून देतो माझे नाफेड अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे, असे सांगून कार्यालयातून काढता पाय घेतला. तसेच भ्रमणध्वनी सुद्धा बंद करून ठेवला. कार्यालयातील डाटा ऑपरेटर सतीश जाधव व अन्य कर्मचारी यांना शेतकरी मुलीने सोयाबीन पोते देण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत असभ्य वागणूक दिली. आपले सोयाबीन मिळेल या आशेने शेतकरी मुलगी गोडाऊन परिसरातच रात्री 10 वाजेपर्यंत ताटकळत उभी होती. त्यामुळे, अधीक्षक महेश गिरी व डाटा ऑपरेटर सतीश जाधव तसेच संबंधित कर्मचारी यांचेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत शेतकरी मुलीने केली आहे.
सोयाबीन खरेदीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ
केंद्राने सोयाबीन खरेदीसाठी 24 तारखेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना आणखी थोडा दिलासा मिळाला असून केंद्र सरकारच्या या निर्णयाचे किसान सभेकडून स्वागत करण्यात आले आहे. केंद्राने मुदतवाढ दिल्यानंतरही अद्याप अनेक ठिकाणी खरेदी केंद्र सुरू नाहीत. जी केंद्रे सुरू आहेत, तिथे पॅकिंगसाठी पुरेसा बारदाना उपलब्ध करून द्यावा. सरकारने त्यासाठी पाऊले टाकावीत. निधी उपलब्ध करून द्यावा आणि अधिक मात्रेने सोयाबीन खरेदी करावी. मागणी नुसार सरकारी सोयाबीन केंद्र वाढवावे, अशी मागणी किसान सभेनं केली आहे.
























