IAS पूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात, ऑडीवरील 'लाल दिवा' भोवणार; पुणे पोलीस कारवाई करणार
पूजा खेडकर यांची युपीएससी परीक्षेतून निवड झाली असून सध्या त्या महाराष्ट्र केडरच्या 2022 च्या बॅचमधील IAS अधिकारी आहेत.
पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची नियुक्ती वादात सापडली असून पुण्यात कार्यरत असताना खासगी गाडीवर त्यांनी सरकारी लाल दिवा लावल्याने त्यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. आधीच बोगस प्रमाणपत्रांच्याआधारे युपीएससी परीक्षेतून अधिकारी झाल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर होत आहे. त्यातच, आता पुण्या प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी (Collector) असताना त्यांनी विनापरवाना स्वत:च्या खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावला, तसेच कारवर महाराष्ट्र शासन ही पाटीही लावली होती. त्यामुळे, त्यांच्यावर पुणे पोलिसांकडून (Pune) कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पूजा खेडकर यांचा पुण्यात प्रोबेशनरी पदावर असतानाचा रुबाब, थाट, श्रीमंताचा दिखावा त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्यांनी स्वत:च्या ऑडी कारवर लाल दिवा लावून प्रशासकीय रूबाबही दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आता, याप्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर असल्याचे दिसून येते.
पूजा खेडकर यांची युपीएससी परीक्षेतून निवड झाली असून सध्या त्या महाराष्ट्र केडरच्या 2022 च्या बॅचमधील IAS अधिकारी आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुण्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, या काळातील पूजा खेडकर यांचा रुबाब जिल्हाधिकाऱ्यांनाही लाजवणार होता. प्रोबेशनरी अधिकाऱ्यासाठी स्वतंत्र केबिन किंवा गाडीची सुविधा नसते. मात्र, पूजा खेडकर या स्वत:च्या खासगी ऑडी गाडीवर लाल-निळा दिवा आणि महाराष्ट्र शासन अशी नेमप्लेट लावून फिरायच्या. याशिवाय, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावून पूजा खेडकर यांनी तिकडे स्वत:चे कार्यालय थाटले होते. या कार्यालयातील फर्निचरही पूजा खेडकर यांनी बदलले होते. या सगळ्या सरंजामी थाटामुळे पूजा खेडकर या सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अखेर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहून त्यांच्या बदलीची शिफारस केल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला होता. त्यानंतर, आता पुणे पोलिसांकडून त्यांनी स्वत:च्या कारवर लाल दिवा लावल्याप्रकरणी कारवाई करणार आहेत.
पुणे पोलीस कारवाई करणार
पूजा खेडकर यांनी वापरलेल्या ऑडी कारवर बेकायदेशीरपणे बिकन (दिवा) लावल्या बद्दल पुणे पोलिस कारवाई करणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पूजा खेडकर यांनी गाडीवर "महाराष्ट्र शासन" अशी पाटी देखील लावली होती. याप्रकरणी देखील पोलिसांकडून कारवाई होणार असल्याचे समजते. मोटर वाहन नियम कायद्यांतर्गत ही कारवाई होणार आहे. खेडकर यांनी वापरलेल्या त्या ऑडी कारवर वाहतूक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी 21 हजार रुपयांचा दंड सुद्धा आहे. दरम्यान, पुजा खेडकर यांच्यावर कारवाईचे स्वरुप काय असेल, त्यांना आर्थिक दंड होणार की गुन्हा दाखल होणार याबाबतचे चित्र लवकरच पोलिसांकडून स्पष्ट होईल.