Hinjawadi Fire Accident News: जेवणाचे डबे, अर्धवट जळालेल्या चपला! हिंजवडीमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या चौघांनी शेवटपर्यंत जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला पण...
Hinjawadi Fire Accident News: टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक लागलेल्या आगीच्या घटनेमध्ये चौघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे, त्याचबरोबर अनेक जण जखमी झाले आहे.

पुणे: शहरातील हिंजवडी परिसरामध्ये एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागल्याची घटना काल (बुधवारी, ता-20) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये कंपनीतील चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. टेम्पो ट्रॅव्हल्स देखील जळून खाक झाली आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 14 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये जात असताना अचानकपणे चालकाच्या पायाखाली आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार लॉक झाले, ते न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाला. काही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व कर्मचारी सकाळच्या शिफ्टला ऑफिसला चालले होते. दरम्यान या घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, या घटनेनंतर त्या जळालेल्या बसच्या कोपऱ्यामध्ये जेवणाचे डबे, जळालेल्या चपला दिसत होत्या.
या बसमधील जळालेल्या सीटचा कोळसा झाला आहे. गाडीच्या आतील धातू देखील वितळला आहे. त्या कोळशाखाली अर्धवट जळलेले कपडे, चपला, जेवणाचे डबे, आणि बसला आग लागलेल्यानंतर जीव वाचवण्यासाठी अखेरच्या क्षणी झगडल्याच्या खुणा त्याठिकाणी दिसून येत आहे. त्या जळालेल्या टेम्पो ट्रॅव्हल्सच्या एका कोपऱ्यात एक स्टीलचा डबा पडलेला होता. त्याचं झाकण अर्धवट उघडलेलं दिसत होतं. काही डब्यांची झाकण उघडलेली होतं, तर काही डबे तसेच लावलेले बंद होते. कामासाठी सकाळी घरातून निघालेल्या या कर्मचाऱ्यांच्या हातात दिलेला तो डबा पाहून मन सुन्न होतं.
नेमकं काय घडलं?
राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील (आयटी पार्क) व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या बसला (टेम्पो ट्रॅव्हलर) बुधवारी (ता. 19) सकाळी आग लागल्याची घटना घडली. त्यातील चार कामगारांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर घटनेमध्ये सहा जण जखमी झाले आहेत, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर चार जणांची प्रकृती ठीक आहे. हिंजवडी आयटी पार्क फेज एकमध्ये ही घटना घडली आहे. हिंजवडी आयटी पार्क टप्पा दोनमध्ये तिरुमाला इंडस्ट्रिअल इस्टेट आहे. त्यात व्योम ग्राफिक्स कंपनी आहे. त्यातील पहिल्या शिफ्टसाठी चालकासह 14 कर्मचारी कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलर बसमधून (एमएच 14-सीडब्लू 3548) जात होते. मात्र, हिंजवडी टप्पा एकमधील विप्रो सर्कलपासून काही अंतरावर बस आल्यानंतर चालक जनार्दन हंबर्डीकर यांच्या पायाजवळ आग लागली.
हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्सच्या आगीतील मृतांची नावं
-सुभाष भोसले, वय 42
-शंकर शिंदे, वय 60
-गुरुदास लोकरे, वय 40
-राजू चव्हाण, वय 40,
सर्व राहणार पुणे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

