(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parbhani : ग्रामपंचायतीची जागा एक अन् अर्ज आले 203; मराठा आरक्षणासाठी आख्ख्या गावानेच वाजत गाजत भरला अर्ज
ग्रामपंचायतीच्या (Grampanchayat Election) एका जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव हे आख्खं गावच वाजत गाजत आलं होतं.
परभणी: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) कुठे पुढाऱ्यांना गावबंदी केली जातेय, कुठे धरणे आंदोलन धरली जातात, कुठे बेमुदत उपोषण तर कुठे सभा आणि विविध आंदोलन केली जात आहेत. मात्र परभणीच्या पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Grampanchayat Election) एका जागेसाठी चक्क 203 महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची घटना घडली. अगोदर मराठा आरक्षण द्या मग निवडणूक घ्या असा नारा देत गावकऱ्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांच्या या पवित्र्यामुळे निवडणूक विभागाची चांगलीच पंचाईत होणार हे मात्र निश्चित.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिलेली आहे. जी आता संपत आलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गावागावात आंदोलनाची तयारी केली जातेय. सध्या राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत ही आरक्षणाची मागणी करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी परभणीच्या पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव गावाने अनोखे आंदोलन केलं आहे.
या गावातल्या एकाच जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत गावकऱ्यांनी पहिल्यांदा बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याने काही फरक पडणार नसल्याचे लक्षात येताच गावातील सर्वच महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आख्ख गावच वाजत गाजत पाथरी तहसील कार्यालयावर आले. यावेळी एकूण 203 महिलांनी आपले उमेदवारी अर्ज दाखले केले आहेत.
आता जर सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले तर ठीक अन्यथा एकही महिला आपला अर्ज मागे घेणार नाही असा निर्धार या महिलांनी केला. शिवाय पुढच्या लोकसभा, विधानसभेसह सर्वच निवडणुकांत अशाच पद्धतीने सर्व गावकरी आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील असा इशाराही या गावकऱ्यांनी सरकारला दिला आहे.
मराठ्यांना शांततेच आरक्षण मिळवून देणार
मराठ्यांचे आंदोलन शांततेत सुरू आहे. हे शांतता युद्ध आहे. ठोकल्याशिवाय आंदोलन मिळत नाही, अशी एकेकाळी मराठा समाजाची भावना होती, पण आता शांततेतच आरक्षण मिळवणार असा माझा शब्द आहे. मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय समाज एक इंचही मागे जाणार नाही असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. मनोज जरांगे हे पुण्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज राजगुरूनगरमध्ये मराठा बांधवांची सभा घेतली.
ही बातमी वाचा: