Nashik News : देवस्थान ट्रस्ट आणि पुजाऱ्यांचा 60- 40 टक्क्यांचा फॉर्मुला? त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ मंदिरातील दानपेटीतील उत्पन्नावरून वाद
Sant Nivruttinath Mandir : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणारे त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज देवस्थान वादात अडकले आहे.
नाशिक : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणारे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज देवस्थान (Nivrutti Maharaj Mandir) वादात अडकले आहे. मंदिरातील दानपेटीतील उत्पन्नावरून वादाला सुरुवात झाली आहे. दान पेटीतून मंदिराच्या पुजाऱ्यांना मिळणारे उत्पन्न बंद करावे, अशी मागणी काही वारकरी प्रतिनिधींनी केली असून हा वाद धर्मदाय आयुक्त कार्यालयात पोहचला आहे. तर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे देवस्थानचा कारभार सुरू असल्याचा पूजाऱ्यांचा दावा आहे.
ज्ञानेश्वर माऊलींचे ज्येष्ठ बंधू भागवत धर्माची पताका फडकविणारे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची (Sant Nivruttinath) संजीवन समाधी मंदिर नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwer) आहे. वर्षोनुवर्षे वंश परंपरेनुसार गोसावी कुटुंब मंदिराची देखभाल, नित्य पूजा करत आहेत. आधी गोसावी कुटुंबीय सर्व कारभार बघायचे. मात्र कालांतराने विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली. दानपेटीतील मिळणाऱ्या उत्पन्नातून 40 टक्के वाटा गोसावी कुटुंबीयांना तर 60 टक्के वाटा देवस्थान ट्रस्टला दिला जातो. ट्रस्टकडून वार्षिक सण उत्सव, पालखी सोहळे, वीज बिलासह इतर प्रशासकीय खर्च पार पडले जातात. तर गोसावी कुटूंबीयांकडून देवाची नित्य पूजा, नैवेद्य, विणेकरी, पहारेकरी यांची भोजन व्यवस्था आणि इतर काम केली जातात.
दरम्यान दानपेटीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाटेकरी असल्यानं देवस्थानच्या ठेवी नाही, उत्पन्नपेक्षा ट्रस्टचा खर्च जास्त होत आहे. पालखी मार्गात मिळणाऱ्या धान्यात देवस्थानचा वाटा नाही, अशी ओरड काही विश्वस्त आणि वारकरी प्रतिनिधींनी केली होती. धर्मादाय आयुक्त (Charity) कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून देवस्थानच्या ठरावात बदल करून पुजाऱ्याना मिळणारे उत्पन्न बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाविकांच्या मिळणाऱ्या दानाच्या रकमेतून दोन्ही बाजूचा खर्च केला जातो. या संदर्भात 2008, 2014 मध्ये देखील वाद निर्माण झाला होता. प्रकरण तेव्हाही न्यायालयात गेले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसारच 60- 40 टक्क्यांचा फॉर्मुला ठरला असल्याचा पुजाऱ्यांचा दावा आहे.
... तर न्यायालयात दाद मागणार....
त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथील संत निवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या सेवेसाठी अहोरात्र झटत असताना स्वतःची वडिलोपार्जित जागाही देवस्थानच्या कामासाठी दिल्या आहेत. वंशपरंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराज, पेशवेकालीन, ब्रिटिशकालीन सनद असल्याचा दावा गोसावी कटुंबीयाकडून केला जातो आहे. उत्पन्नावरून निरर्थक वाद सूरु करण्यात आला असून कोणाला आक्षेप घ्यायचा असेल तर न्यायालयात दाद मागण्याचे आव्हान गोसावी कुटुंबियांकडून दिले जात आहे. दरम्यान निवृत्तीनाथ मंदिर देवस्थानच्या जीर्णोद्धाराचे काम जोमाने सुरु आहे. भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रसाद योजनेबरोबरच जीर्णोद्धारासाठी निधी संकलित केला जात आहे. मंदिर नवं रूप धारण करत असतानाच वादाचे ग्रहण लागल्यानं वाद लवकर मिटवा, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.
इतर महत्वाची बातमी :