Sant Nivruttinath Palkhi : सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी! आज संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
Nashik News : आज श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी दुपारी 2 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. सुमारे 25 हजाराहून अधिक वारकरी, भाविक या पायी दिंडी पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
![Sant Nivruttinath Palkhi : सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी! आज संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान sant nivruttinath palkhi Sohala Departure of Saint Nivrittinath Maharaj Palkhi to Pandharpur today Pandharpur News Sant Nivruttinath Palkhi : सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी! आज संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/02/77dd523e265be881e11c14dc0f3f6c571685671990273322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Saint Nivrittinath Maharaj Palkhi : वारकरी आणि पंढरीच्या विठुरायाच्या भेट लवकरच होणार असून आज श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी दुपारी दोन वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. जवळपास 25 हजाराहून अधिक वारकरी, भाविक या पायी दिंडी पालखी सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस वारकऱ्यांना लागलेली असून वारकऱ्यांची पाऊले आज पंढरीच्या दिशेने चालू लागणार आहेत.
वारकऱ्यांची पाऊले आज पंढरीच्या दिशेने
श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी चांदीचा रथ पायी दिंडी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. नाशिक जिल्ह्यातून 25 हजार वारकरी या दिंडीत सामील होतील असा अंदाज आहे. यावर्षी एक दिवस अगोदर पालखी पंढरपूरला रवाना होणार असून पालखीचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वर शहरांतील श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्यात होणार आहे. या महानिर्वाणी आखाड्यात गुरु गहिनीनाथांची समाधी असल्याने इथे पहिला मुक्काम होणार आहे.
45 पालख्या आणि हजारो वारकरी पायी दिंडीत सहभागी
यंदा जवळपास 45 पालख्या आणि हजारो वारकरी पायी दिंडीत सहभागी झाले असून जिल्ह्यात वारकऱ्यांसाठी 12 फिरते शौचालय आणि पिण्याच्या पाण्याचे पाच टँकर प्रशासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी चतुर्दशीच्या दिवशी होणारे प्रस्थान यंदा त्रयोदशीला होणार आहे. तर संत निवृत्तीनाथांच्या पालखीला निरोप देण्यासाठी विदर्भ मराठवाड्यातील विशेषता बीड जिल्ह्यातील भाविक वारकरी देखील त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल आहेत. गुरुवारी निर्जला एकादशी दिनी बीड जिल्ह्यातील जवळपास दहा हजार भाविकांनी पहाटेच ब्रह्मगिरी प्रदक्षिणा प्रारंभकरीत नगरीत हजेरी लावली.
25 हजार भाविकांचा सहभाग
संत निवृत्तीनाथांच्या दिंडीत नाशिक जिल्ह्यातील 25 हजाराच्या वर मानकरी दिंड्या सामील होतात. या दिंड्यांचे प्रमुख मानकरी विणेकरी, टाळकरी, चोपदार यांच्यासह काही वारकरी थेट त्र्यंबकेश्वरपासून दिंडीत सामील होतात. पालखी दिंडीच्या पायी वाटचाल मार्गात नाशिक जिल्ह्यातून विविध गावांवरून, ठिकाणावरून पंचवीस हजारावर वारकरी दिंडीच्या मार्गात सामील होणार आहेत. दिंडीनगर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर सुमारे चाळीस हजार वारकरी संत निवृत्तीनाथांच्या दिंडीत सामील होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पालखीच्या रथाला झळाळी
सात वर्षांपूर्वी सुमारे एक कोटी रुपये खर्च करून मागील यापूर्वीच्या विश्वस्त मंडळांने चांदीचा रथ पालखी सोहळ्यासाठी तयार केलेला आहे. या रथाला झळाळी देण्यात आली असून आज दुपारी हा रथ बाहेर काढला जाणार आहे. फुलांच्या सजावटीसह आकर्षक अशा रथाला सर्जा राजाची जोडी सोबतीला असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Pandharpur : आषाढी वारीसाठी टोलमाफी! चोख नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)