रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रित करण्यासाी रेल्वेनं मर्यादीत प्रवेश नियंत्रण प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीनुसार स्टेशनच्याबाहेर होल्डिंग म्हणजेच वेटिग रुम सुरू करण्यात येईल.

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini vaishnav) यांनी संसदेत माहिती देताना रेल्वे (Railway) सेवेसंदर्भात घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल सांगितलं. रेल्वे स्टेशन म्हणजे गर्दीचं ठिकाण हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. त्यातच, महानगर, मेट्रो सिटीतील रेल्वे स्थानकांवर जत्रा, यात्रा, उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी आणि इतर सुट्टीच्या हंगामात मोठी गर्दी असते. अनेकदा रेल्वे स्थानकावरील ही गर्दी चेंगराचेंगरीचे कारणही बनते. रेल्वे स्थानकावरील या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये, मोठ्या आकाराचे फुटवेअर ब्रीज, सीसीटीव्ही आणि वॉर रुम यांसारख्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. तर, देशातील 60 रेल्वे स्थानकांवर केवळ कन्फर्म तिकीट असलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. वेटिंग लिस्ट आणि विनातिकीट प्रवाशांना स्टेशनच्या बाहेरच प्रतिक्षा रुममध्ये थांबावे लागणार आहे.
रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रित करण्यासाी रेल्वेनं मर्यादीत प्रवेश नियंत्रण प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीनुसार स्टेशनच्याबाहेर होल्डिंग म्हणजेच वेटिग रुम सुरू करण्यात येईल. त्यामध्ये, ट्रेन प्लॅटफॉर्मवर येईपर्यंत प्रवाशांना बसवून ठेवण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, 2024 च्या सणासुदीच्या काळात सूरत, उधणा, पाटणा आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर असे होल्डींग एरिया तयार करण्यात आले आहेत. महाकुंभच्या दरम्यान प्रयागराजमधील 9 स्थानकांवर देखील ही व्यवस्था उभारण्यात आली होती. या अनुभवाच्या आधारे देशभरातील 60 रेल्वे स्थानकांवर कायमस्वरुपीचा वेटींग एरिया असणार आहे.
देशातील 60 रेल्वे स्थानकांवर पूर्ण प्रवेश नियंत्रण लागू करण्यात येईल. त्यामुळे, केवळ कन्फर्म रिझर्व्हेशन तिकीट असणाऱ्यांनाच येथे प्रवेश दिला जाईल. वेटिंग लीस्ट आणि बिनतिकीट प्रवाशांना बाहेरील प्रतिक्षा क्षेत्र म्हणजेच होल्डिंग एरियातच वाट पाहावी लागेल. अनाधिकृत प्रवेशद्वारांना देखील बंद केला जाईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.
सीसीटीव्हींची संख्या वाढवणार
रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची सुरक्षा वाढविण्यासाठी, रात्रीच्या वेळेसही प्रवाशांना सुरक्षा मिळावी, त्यांना भीती वाटू नये म्हणून रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. नव्या डिझाईनचे 12 मीटर आणि 6 मीटर लांब एफबीओ बनविण्यात येत आहेत. गर्दी नियंत्रित करण्यासाठी त्यांची मदत होणार आहे. तसेच, सर्वच प्रमुख रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्हींच्या संख्येत वाढ केली जाईल, अशीही माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.
वॉर रुमची उभारणी
गर्दीच्या नियंत्रणासाठी रेल्वे स्टेशनवर वॉर रुमही उभारण्यात येणार आहेत. गर्दीच्या काळात सर्वच विभागातील अधिकारी समन्वयाने काम करतील. सर्वच गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर वॉकी-टॉकी,अनाऊंस प्रणाली आणि डिजिटल संचारप्रणाली उपकरण लावण्यात येणार आहेत.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
