Nashik Trimbakeshwer : मोबाईल शौचालय, वारकऱ्यांचे वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, अशी असणार संत निवृत्तीनाथ महाराज पालखी वारी
Nashik Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथून निघणारी संत निवृत्तीनाथ महाराज (Sant Nivruttinath Maharaj) पालखी सोहळ्याची तयारी सुरु आहे.
Nashik Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथून निघणारी संत निवृत्तीनाथ महाराज (Sant Nivruttinath Maharaj) पालखी सोहळ्याची तयारी सुरु आहे. पंढरपूरवारी साठी यंदा हरित आणि निर्मला वारी करण्यावर भर राहणार असून यात मोबाईल शौचालय, प्रत्येक वारकऱ्यांचे वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे आदी उपक्रम वारी दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा संत निवृत्तीनाथ मंदिर संस्थानकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.
त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पारंपरिक पालखी 2 जून 2023 ला पंढरपूरकडे (Trimbakeshwer To Pandharpur Palkhi) प्रस्थान करणार आहे. त्याअनुषंगाने निवृत्तिनाथ तयारी सुरू आहे. काही दिवसांत पालखी सोहळा निर्वीघ्नपणे पार पाडण्यासाठी स्वयंसेवकाची समिती गठित करण्यात येणार असल्याची माहिती आषाढी वारी पालखी सोहळा प्रमुख नारायण मुठाळ तसेच निवृत्तीनाथ समाधी संस्थांनचे अध्यक्ष निलेश गाढवे यांनी दिली. पालखी मार्गाचा पाहणी दौरा दोन-तीन दिवसात करण्यात येणार असून हरितवारी (Nirmal Wari) यशस्वी करण्यासाठी वारकऱ्यांनी किमान एक झाडाचे रोपटे आपल्या सोबत आणावे, असे आवाहन संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जूनला पंढरपूरसाठी निघणार आहे. या वारीत अनेक गावांमध्ये वारीचा मुक्काम असणार आहे. त्यामुळे ज्या गावात पालखीचा मुक्काम असेल, त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा मानस यापूर्वी संस्थानने व्यक्त केला आहे. त्यानुसार येणारी वारी ही निर्मल व हरित करण्यासाठी एक वृक्ष संवर्धन समिती गठीत करण्यात येणार आहे. कोणत्याही सेवाभावी संस्थेला रक्तदान करावयाचे असल्यास रक्तदान शिबिरे आयोजित करून गरजू रुग्णांना मदत होईल, अशा प्रकारे नियोजन करण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी ज्या स्वयंसेवकांची समिती नेमण्यात येणार आहे, त्या समितीमध्ये अधिकाधिक लोक सेवाभावी संस्था तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबविणारे असतील तर त्याचा वारीसाठी उपयोग होईल, या हेतूने या समितीकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे. आषाढी वारीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन संत निवृत्तीनाथ संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
हरित आणि निर्मल वारीचा संकल्प
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या प्रदीर्घ अंतरामध्ये विविध उपक्रम घेण्याचा मानस आहे. कोणत्याही प्रकारचे प्लास्टिकचे कागद, कचरा न राहता स्वच्छता ठेवणे, तसेच जिथे जिथे पालखीचा मुक्काम आहे. तेथे उघड्यावर शौचास न बसता यंदाच्या वर्षी मोबाईल शौचालयाची व्यवस्था करण्यासाठी संस्थान आग्रही राहणार आहे. जिथे जिथे शक्य असेल, त्या ठिकाणी हागणदारीमुक्त वारी करण्याचा प्रामाणिक करणार आहे. तसेच ‘निर्मल वारी हरित वारी’ अभियानातून श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातून दिंडीमार्गावर झाडे लावून, बिया रोवून पर्यावरणाला हातभार लावण्याचा आगळावेगळा प्रयत्न होत आहे.