Sant Nivruttinath Palkhi : 'जातो माघारी विठुराया, तुझे दर्शन झाले आता! संत निवृत्तीनाथांची पालखी निघाली त्र्यंबकेश्वरला!
Sant Nivruttinath Palkhi : विठुरायाचा निरोप घेत संत निवृत्तीनाथांची दिंडी (Sant Nivruttinath Palkhi) पालखीने आजपासून परतीचा प्रवास सुरु केला आहे.
Sant Nivruttinath Palkhi : विठू दर्शन झाले, सुख ओंजळीत आले! ध्यास लागला नामाचा, आता येतो पंढरीनाथा' अशा भावपूर्ण वातावरणात विठुरायाचा निरोप घेत पंढरपूरातून संत निवृत्तीनाथांची दिंडी (Sant Nivruttinath Palkhi) पालखीने आजपासून परतीचा प्रवास सुरु केला आहे. जवळपास सतरा दिवसांच्या प्रवासानंतर दिंडी त्र्यंबकेश्वरला पोहचणार आहे. डोळ्याच्या कडा ओल्या करत वारकऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे.
संत निवृत्तीनाथांच्या पालखीसह राज्यभरातून दिंड्या पंढरपुरात (Pandharpur) दाखल झाल्या होत्या. पंचवीस सव्वीस दिवसांच्या पायी प्रवासानंतर दिंड्या पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासासाठी दाखल झाल्या होत्या. संत निवृत्तीनाथांची दिंडी 2 जूनला पंढरपूरकडे निघाली होती. सिन्नर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर आदी प्रवास करत पंचवीस दिवसांनंतर नाथांची पालखी पंढरपुरात पोहचली होती. आषाढीला पंढरीत गर्दीचा महापूर उसळला होता. मात्र हळूहळू वारकऱ्यांनी परतीचा प्रवास सुरु केला आहे. त्यानुसार नाथांची पालखीने देखील आज पंढरपूरातून त्र्यंबकेश्वरकडे (Trimbakeshwer) प्रस्थान केले आहे.
आज सकाळी मोठ्या उत्साहात काल्याचे कीर्तन पार पडले. यानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरातून त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ झाली आहे. यावेळी पंढरपूर नगरीतून माघारी जाताना वारकऱ्यांचे हृदय दाटून येत जड अंतःकरणाने पांडुरंगाला निरोप देताना अनेकांच्या भावनांचा बांध फुटत होता. नगरप्रदक्षिणेनंतर 1 जुलैला शनिवारी बहुतेक पालख्या माघारी गेल्या. परंतु संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी पुनवेची लाही घेतल्याखेरीज माघारी जात नसल्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार पौर्णिमेला काल्याच्या प्रसादानंतर आज 3 जुलैला पालखीचे प्रस्थान झाले आहे. जवळपास सतरा दिवसांचा परतीचा प्रवास करून 20 जुलैला पालखी त्र्यंबकेश्वर नगरीत पोचणार आहे. तसेच श्री संत मुक्ताई पालखीचे (Sant Muktabai Palkhi) देखील पंढपूरवरून मुक्ताईनगरकडे प्रस्थान झाले आहे.
असा असणार परतीचा प्रवास
आज संत निवृत्तीनाथांची दिंडी पालखीचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यानुसार आज पंढरपूरातून दिंडी मार्गस्थ झाली आहे. दुपारी भटउंबरे गावी दुपारचे जेवण करून तुळशी गावात मुक्कामी जाणार आहे. त्यानंतर 04 जुलै रोजी तुळशी गावातून प्रस्थान करत पुढे वरवडे गावात दुपारचे जेवण त्यानंतर पिंपळनेर गावी मुक्कामी जाणार आहे. 05 जुलै रोजी पिंपळनेर गावातून पुढे जात लिमगाव येथे दुपारचे जेवण करून रात्री मुक्कामाला केमला जाणार आहे. त्यानंतर 06 जुलै रोजी केम येथून निघून दुपारी मलवडी , तर रात्री झरे येथे मुक्काम होईल. 07 जुलै रोजी झरे येथून निघून करमाळा येथील देवळाली येथे दुपारचे जेवण त्यानंतर जातेगावात मुक्कामी जाईल. 08 जुलै रोजी जातेगावातून निघून पाटेवाडी चापडगाव येथे दुपारचे जेवण करून पुढे बाभुळगावला मुक्काम होईल.
त्यानंतर 09 जुलै रोजी बाभुळगावातून पुढे मार्गक्रमण करत घोगरगावला दुपारचे जेवण होईल, त्यानंतर मुक्कामाला वाटेफळला जाईल. 10 जुलै रोजी वाटेफळ येथून निघून शिरढोणला दुपारचे जेवण करून दिंडी अहमदनगरला मुक्कामी पोहचेल. 11 जुलै रोजी नगर मुक्कामानंतर विळद मार्गे नांदगाव येथे मुक्काम होईल. 12 जुलै रोजी नांदगाव येथून निगुन राहुरीला दुपारचे जेवण झाल्यानंतर गुहा येथे त्या दिवशीचा मुक्काम होईल. 13 जुलै रोजी गुहा येथून निघून दुपारी कोल्हार येथे जेवण करून मुक्कामासाठी दिंडी गोगलगावी पोहचेल. 14 जुलै रोजी गोगलगाव येथून निघून वडझरीमार्गे नान्नजला पोहचेल. त्यानंतर 15 जुलै रोजी नान्नजवरून निघालेली दिंडी पिंपळे, निमोण मार्गे सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटेला मुक्कामी येईल.
त्यानंतर 16 जुलै रोजी नाथांची दिंडी नांदूर शिंगोटेहून निघून दोडी ला मुक्काम असेल. त्यानंतर 17 जुलै रोजी दोडी येथून निघून दुपारचे जेवण गोंदे येथे करून दिंडी सिन्नरला मुक्कामी पोहचेल. त्यानंतर 18 जुलै रोजी सिन्नर येथून मार्गक्रमण करत दिंडी चिंचोली येथे दुपारचे जेवण करून पुन्हा चेहेडीला मुक्कामी जाईल. 19 जुलै रोजी चेहेडी येथून दिंडी दुपारी देवळाली गावात पोहचेल. देवळाली येथून पुढे त्र्यंबक रस्त्यावरील पिंपळगाव बाहुला येथे मुक्कामी पोहचेल. 20 जुलै रोजी पिंपळगाव बहुला येथील मुक्कामांनंतर नाथांची दिंडी महिरावणी मार्गे सायंकाळी त्र्यंबकेश्वरला पोहचेल.