Nashik News : नाशिक मनपाचे निवारा केद्रांत 200 हून अधिक बेघरांना 'सहारा', बँक खात्यांसह आधारकार्डही मिळणार
Nashik News : नाशिक (Nashik) महापालिकेच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून शहरातील बेघरांना (Homeless Center) सहारा देण्याचे काम सुरु आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) महानगरपालिकेकडुन बेघरांचे सर्व्हेक्षण करुन त्यांना मनपाच्या (Nashik NMC) निवारा केंद्राचा आधार दिला जात आहे. जुन 2021 पासुन मनपातर्फे संत गाडगे महाराज शाळा आणि इंद्रकुड येथे सुमारे 150 ते 200 बेघरांना निवारा आणि भोजन पुरविण्यात येत आहे. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (NMC Commissioner) यांच्या सुचनेनुसार वेळोवेळी शहरातील मुंबई नाका, द्वारका इत्यादी मुख्य चौक, सिग्नल या ठिकाणी बेघर शोध मोहिम राबवून लाभार्थ्यांना निवारा केंद्रात दाखल केले जात आहे. उपायुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या सहाही विभागात सहा पथकांद्वारे ही मोहीम राबवली जात आहे.
नाशिक महापालिकेच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून शहरातील बेघरांना सहारा देण्याचे काम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महत्वाच्या ठिकाणी निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील तपोवन बेघर निवारा केंद्रात (Homless Shelter Center) सध्या 102 लाभार्थी असून त्यापैकी 19 जणांचे पुनवर्सन करण्यात आले आहे. गंगाघाट येथील संत गाडगे महाराज बेघर निवारा केंद्रात सध्या 68 लाभार्थी असून त्यापैकी 26 जणांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. चहा, नाष्टा व दोन वेळेचे मोफत जेवण बरोबरच लाभार्थीची दरमहा आरोग्य तपासणी करण्यात येते. मानसिक आरोग्य शिबीर घेण्यात येते दर महिन्याला केशकर्तनही केले जात आहे. मास्क, सॅनिटासझरचेही वाटप करण्यात आले आहे. आधार कार्ड काढले जाते. सदर निवारा केंद्रात रक्षाबंधन, गणेशोत्सव, गुढी पाडवा या सणाबरोबरच स्वातंत्र दिन आदी राष्ट्रीय सण समारंभ देखील साजरे केले जातात.
नाशिकरोड येथे आढळलेले मानसिक रुग्ण असलेले पाच जणांचे बेघर कुटुंबही तपोवन केंद्रात वास्तव्यास आहे. त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयामार्फत उपचार सुरु आहेत. मनपाकडून काही वृद्ध बेघरांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले. मागील आठवड्यात एक वृद्ध महिला पिनॅकल मॉल, त्र्यंबक नाका इथल्या फुटपाथवर चार दिवसांपासून बसून होती. त्याची माहिती मिळताच मनपा उपआयुक्त यांनी एनयूएलएम कर्मचा-यांमार्फेत सदर वृद्ध महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. उपचारानंतर या वृद्ध महिलेला निवारा केंद्रात दाखल करण्यात येणार आहे. यापूर्वी देखील फुटपाथवर आजारी अवस्थेत आढळलेल्या वृद्धांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करुन उपचारानंतर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांचे बॅंक खाते उघडण्याचीही कार्यवाही सुरु असून त्यांचे आधारकार्डही काढले जात आहे.
पुनर्वसनाचे उद्दीष्ट
आत्तापर्यंत सुमार 45 बेघर नागरिक व त्यांचे कुटुंबाचे समुपदेशन करून त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे. तसेच शहरात भविष्यात जास्तीत जास्त लाभार्थ्यांचे पुनर्वसन करणे तसेच बेघर लाभार्थ्यांना नर्सरी, कागदी पिशव्या, द्रोण बनवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचा मानस असल्याचे मनपा उपायुक्त करुणा डहाळे यांनी सांगितले. 2019 साली शहरात झालेल्या सर्वेक्षणात एकूण 894 बेघर लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी 180 क्षमतेचे कायमस्वरुपी बेघर निवारा केंद्र तपोवन, पंचवटी येथील नवीन इमारतीत कार्यन्वित करण्यात आलेले आहे. उर्वरीत उद्दीष्ट पूर्तता करण्याकामी 100 बेघर क्षमतेचे आणखी पाच निवारा केंद्र स्थापण्याचे उद्दीष्ट आहे. त्या अनुषंगाने पंचवटी, सातपूर, नाशिक पूर्व, नाशिक रोड अशा चार जागांवरील एकूण 581 क्षमतेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मान्यतेसाठी शासनाला सादर झाला आहे. त्यामध्ये शहराच्या नाशिकरोड, चेहडी, वडाळा, तपोवन आदी ठिकाणी सुमारे 580 बेघरांना निवारा देण्याची व्यवस्था होणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी बेघर व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ मनपा कार्यालयाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन उपायुक्त एन.यु.एल.एम यांच्या मार्फत करण्यात आले आहे.