देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
Devendra Fadnavis: शपथविधी सोहळ्यानंतर राज्यभर जल्लोष केला जात आहे. तर महायुतीसह विरोधी पक्षातील नेतेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत आहेत.
CM Oath Ceremony: महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, विविध राज्यांचे मुख्यमंत्री व हजारो मान्यवर व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. शपथविधी सोहळ्यानंतर राज्यभर जल्लोष केला जात आहे. तर महायुतीसह विरोधी पक्षातील नेतेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अमृता फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आनंदात म्हणाल्या, 'आज माझ्या पतीने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ही आनंदाची गोष्ट आहे. पण ही जितकी मोठी बाब आहे तेवढीच मोठी जबाबदारी ही आहे. आता संपूर्ण राज्याला जोर लावून पुढे न्यायचे आहे . पुढे त्या म्हणाल्या, विरोधकांनी अनेक वैयक्तिक हल्ले केले, पण आता कटूता दूर केली नाही तर कसं पुढे जाणार राज्य.. राज्याला पुढे नेण्यासाठी आपल्याला एकत्र पुढे जायचे आहे. लाडक्या बहिणींनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्यानंतर त्या सोबत आहेत आणि सोबतच राहतील.' असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
'देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पदाचे तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. सहा वेळा ते आमदार राहिले आहे. त्यांनी आपला जीवनकाळ लोकसेवेत घालवलाय. मी पुन्हा येईन ही त्यांची हाकही लोकसेवेसाठी रोज येईन.. हेच आहे. त्यामुळे मी पुन्हा येईन रोज व्हायला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र नंबर एक वर राहील' असेही त्या म्हणाल्या.
राज ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदन केलंय. पुढचे पाच वर्ष सरकारच्या कोणत्याही चांगल्या उपक्रमात माझा आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल असे जाहीर केलाय. फडणवीसांना 2019 मध्ये ही संधी मिळायला हवी होती असंही ते म्हणाले आहेत. 2022 मध्ये ही फडणवीसांची संधी हुकली. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता फडणवीसांनी मिळालेल्या संधीचा योग्य वापर करावा असं ट्विट करत राज ठाकरे यांनी पुढील पाच वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना राज ठाकरेंचा पाठिंबा असेल असं सांगितलं.
नवनीत राणांनीही दिल्या शुभेच्छा
ज्या लोकांनी 2019 मध्ये धोका दिला होता, धोका देऊन ज्यांनी 2019 ला शपथ घेतली, आज यावरून हे सिद्ध होतंय की धोकेबाजांना महाराष्ट्राची जनता बाजूला करते. जो सत्याची लढाई लढतो तो मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो. धोकेबाजांना महाराष्ट्राच्या जनतेने चांगला धडा शिकवला. जे स्वप्न आम्ही पाहत होतो ज्यासाठी लढत होतो. सगळी हिस्ट्री डोळ्यासमोरून गेली.
सुधीर मुनगंटीवारांसह पंकजाताईही म्हणाल्या..
तिघांना खूप शुभेच्छा देणार. देवेंद्रजींना शुभेच्छा, एकनाथ शिंदेंना शुभेच्छा, अजित पवारांना शुभेच्छा आणि महराष्ट्राच्या मतदारांना शुभेच्छा असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तर पंकजा मुंडेंनी पुढील कामासाठी देवेंद्रजींना शुभेच्छा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.