Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
मी उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांसह सर्वच प्रमुख नेत्यांना फोन करून शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं.
मुंबई : महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आज शपथ घेतली. मुख्यमंत्री प्रथेप्रमाणे शपथविधी झाला की मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहार संघाशी वार्तालाप करण्यासाठी येत असतात. त्यानुसार, त्यांनी मंत्रालयातील दालनात पदभार स्वीकारला अन् राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला अधिक गतीने आणि जोमाने काम करण्यास सांगितले. जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आपल्याला अधिक वेगाने काम करावे लागेल, असे ते अधिकाऱ्यांना म्हणाले. त्यानंतर, पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर उत्तर देताना महाराष्ट्र घडविण्यासाठी डोक्यात असलेल्या संकल्पनांवर त्यांनी भाष्य केलं. तसेच, विरोधी पक्षांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रमाने स्थान देऊन त्यांचा सहभाग महत्वाचा असल्यासंदर्भात त्यांनी भाष्य केलं. महाराष्ट्राची राजकीय परंपरा जपत शत्रूत्व नसेल हेही त्यांनी सांगितलं. त्यावेळी, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) वक्तव्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही फडणवीसांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं.
सिंचनातील नदी जोड प्रकल्प, सौर ऊर्जेचे 16 हजार मेगावॅटचे प्रकल्प असतील. सामाजिक क्षेत्रातील लाडकी बहीण योजना असेल, मुलींच्या शिक्षणातील 100 टक्के फी देण्याबाबतचे निर्णय पुढे सुरु ठेवायचे आहेत. आम्ही आमच्या वचननाम्यात, जाहीरनाम्यात जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायची आहेत. त्या दृष्टीनं पुढील काळात योग्य वेळी योग्य निर्णय करुन दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत. महाराष्ट्रातील जनतेला आश्वासित करु शकतो, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार पाहायला मिळेल, अडचणी अनेक येतात, त्यावर मार्ग काढत मार्गक्रमण करु, 14 कोटी जनतेला आश्वासित करु इच्छितो की हे सरकार पारदर्शकपणे जनतेच्या कल्याणासाठी काम करेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
विरोधकांचा सन्मान करू
बदल्याचं राजकारण करायचं नाही, बदल दाखवेल, असं राजकारण करु, विरोधकांची संख्या कमी आहे, संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन करणार नाही, त्यांनी योग्य विषय मांडले तर त्यांचा सन्मान देऊ, स्थिर सरकारची पाच वर्ष पाहायला मिळतील. जनतेची अपेक्षा देखील तिच आहे. राज्याला स्थिर सरकार मिळावं अशी जनतेची अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार आहोत, 2100 देखील देणार आहोत, बजेटच्या वेळी त्याचा विचार करु, आर्थिक सोर्सेस योग्य प्रकारे चॅनेलाईज झाल्यानंतर ते करता येतं. जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करु, निकषात असतील त्यांना लाभ मिळेल, निकषाच्या बाहेरच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पूनर्विचार करु, मात्र सरसकट पूनर्विचार करणार नाही, असं देवेंद्र फडवणीस म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरही उत्तर
मी उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांसह सर्वच प्रमुख नेत्यांना फोन करून शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं. त्यावेळी, सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं, पण ते वैयक्तिक कारणास्तव शपथविधीला येऊ शकले नाहीत. महाराष्ट्रात जो राजकीय संवाद आहे, विशेषतः दाक्षिणात्य राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात हा फरक आहे, महाराष्ट्रात राजकीय संवाद संपला नाही. पण अनेक राज्यामध्ये दोन राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये एवढा विसंवाद असतो की जणू खून के प्यासें असं पाहायला मिळतं. महाराष्ट्रात ती कधी नव्हती आणि पुढेही राहू नये हा माझा प्रयत्न राहिन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. त्यावेळी, उद्धव ठाकरेंनी केलेल्या एक तर तू राहिन किंवा मी राहिन या वक्तव्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देखील फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. ''मी त्याही वेळेस सांगितलं होतं. राजकारणात तेही राहतील, मीही राहिन, सगळेच राहतात, ''अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.