मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
तुळजापूर गावात दुपारी 12 ते 2 तर बेलताडा गावात दुपारी दोन ते चार या वेळेत हे मतदान होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

अकोला : सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातील बॅलेट पेपरवरील 'मॉक पोल' मोठ्या वादाचा विषय ठरलं होता. ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान (Voting) घेण्याची संपूर्ण तयारी केली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने गावात जमावबंदी आदेश लागू करत ही मतदान प्रक्रिया थांबवली, त्यामुळे ग्रामस्थांना बॅलेटपेपरवरील इच्छा मतदान घेताच आले नाही. आता, अकोला जिल्ह्यातील दोन गावांनी अशाच पद्धतीने ईव्हीएमला (EVM) आव्हान देण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत या दोन्ही गावात उद्या शुक्रवार 6 डिसेंबर रोजी गावात मॉक पोल घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
माळशिरस मतदारसंघातील विजयी उमेदवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वात मारकडवाडी ग्रामस्थांनी दूध का दूध, पाणी का पाणी म्हणत ईव्हीएम व बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेतील तुलना आणि सत्यता पडताळण्यासाठी बॅलेट पेपवरील मतदान प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाने या मतदान प्रक्रियेला परवानगी नाकारल्यानंतर अखेर ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. मात्र, आता अकोला जिल्ह्यातही पुन्हा एकदा अशाच पद्धतीने बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येत असल्याचे दिसून येते.
पातुर तालुक्यातील तुळजापूर आणि बेलताडा या गावात हे मतदान होणार आहे. तुळजापूर गावात दुपारी 12 ते 2 तर बेलताडा गावात दुपारी दोन ते चार या वेळेत हे मतदान होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यासाठी महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशा तीन पेट्या ठेवल्या जाणार आहेत. यात उमेदवारांचे नाव असलेले बॅलेट वापरले जाणार नाहीत. तर मतदारांनी आपला आधार नंबर किंवा मतदान यादी क्रमांक लिहून आपलं मतदान असलेल्या तीन पैकी एका बॅलेट बॉक्समध्ये टाकायचं आहे. मतदानानंतर लगेच मतमोजणी होणार आहे. विधानसभेत झालेले मतदान आणि उद्याच मतदान याचा तुलनात्मक अभ्यास करण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, मारकडवाडीत पोलिसांनी मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी पुढाकार घेतलेल्या आणि जमावबंदी आदेशाचे पालन न केलेल्या ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे, आता अकोला तालुक्यात पोलीस काय भूमिका घेतात ते पाहावे लागेल.
मारकडवाडीत गुन्हा दाखल
बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम मशीन संदर्भात अफवा पसरवून फेर मतदानाची तरतूद नसताना प्रशासनाचे आदेश डावलल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करुन भीती निर्माण करत समाजात द्वेषाची भावना निर्माण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. बीएनएस 353(1) (ब), 189 (1), (2), 190, 223 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माळशिरसच्या नातेपुते पोलीस ठाण्यात सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
हेही वाचा
पुण्यात धावत्या स्कूल बसला भीषण आग; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

