रोहित सेनेचं आता 'मिशन अॅडलेड'
IND vs AUS Test Series : पर्थच्या स्वप्नवत विजयाच्या गोड आठवणी मनात ठेवून आपण अॅडलेडच्या गुलाबी वातावरणात म्हणजेच पिंक बॉल टेस्टसाठी सज्ज झालोय. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत असं फार कमी वेळा घडतं की, पाहुणा संघ काहीसा रिलॅक्स आहे आणि दबाव यजमानांवर आहे. पर्थ कसोटीत दीडशेत ऑलआऊट झाल्यावर आपण जो कमबॅक केलाय, त्याने नक्कीच ऑसींचं टेन्शन वाढलं असणार. बुमरा आणि कंपनीने कांगारुंच्या फलंदाजीची त्या कसोटीत दाणादाण उडवली. दीडशेच्या स्कोअरला आपल्याला ४६ धावांची आघाडी मिळणं ही बाब ऑसींचं ब्लड प्रेशर वाढवणारी आहे. अर्थात तो सामना, तो निकाल आता इतिहास झालाय.
उद्या नवा दिवस, नवं मैदान, नवं वातावरण असेल. डे-नाईट कसोटी आहे. गुलाबी चेंडू आहे. तरी लढाई गुलाबी, गुडीगुडी वातावरणात नक्कीच नसेल. घमासानच पाहायला मिळेल. रोहित शर्मा, गिल संघात कमबॅक करतायत. रोहितने आपण सलामीला खेळणार नाही, ही बाब स्पष्ट केलीय. गेल्या कसोटीत द्विशतकी सलामी देणारी राहुल-जैस्वाल जोडी त्याला डिस्टर्ब करायची नाहीये. एक कर्णधार म्हणून तसंच एक फलंदाज म्हणून पुन्हा एकदा एका नि:स्वार्थी खेळाडूचं आणि सच्च्या टीम मॅनचं दर्शन त्याने हा निर्णय घेत घडवलंय. पड्डीकल आणि ज्युरेल यांच्या जागी रोहित आणि गिल टीममध्ये येणार हे नक्की. तर, वॉशिंग्टन सुंदरची फलंदाजीतली ताकद पाहता त्याचं प्लेईंग इलेव्हनमधील स्थान कायम राहण्याचीच शक्यता आहे. शिवाय तो एक डावखुरा फलंदाज आहे, हीदेखील बाब त्याच्या बाजूने झुकू शकते.
अॅडलेडच्या मैदानातील कामगिरीची आकडेवारी मात्र यजमानांचा हुरुप वाढवणारी आहे. इथे झालेल्या सातही डे-नाईट कसोटी सामन्यात त्यांनी बाजी मारलीय. उद्याच्या या कसोटीत पहिल्या दिवशी वादळी वातावरणाची, पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने जर वातावरण पावसाळी असेल तर नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. खास करुन संध्याकाळच्या सत्रातही चेंडू स्विंग होऊ शकेल. सध्या कांगारुंची फलंदाजी प्रचंड दबावाखाली आहे. सलामीवीर मॅक्सविनी नवखा आहे. स्मिथ, लाबूशेन या त्यांच्या दोन प्रमुख अस्त्रांच्या धावा झालेल्या नाहीत. मधल्या फळीत गेल्या वेळी हेड आणि मार्शने काहीसा प्रतिहल्ला करत धावा करण्याचा प्रयत्न केला. पण, तशाच शैलीने पुन्हा पुन्हा बॅटिंग करुन कांगारु मोठी धावसंख्या उभारू शकतात का, हाही एक प्रश्न आहे. कारण, तशा शैलीत जोखीम जास्त आहे आणि सुरुवातीच्या विकेट्स गेल्यावर अशी जोखीम पत्करुन मधली फळी या टेस्टला अप्रोच करेल का हाही ते पाहावं लागेल. नेमका हाच मुद्दा हेरुन भारताने सुरुवातीलाच ऑसींना पुन्हा एकदा सुरुंग लावले तर कांगारुंना आपण स्वस्तात ऑलआऊट करु शकतो. पुन्हा एकदा पहिल्या डावातील स्कोअर मॅचचा टोन सेट करेल, असंच दिसतंय. त्यातच मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे पावसाळी हवामानाचा अंदाज यामुळे पहिली बॅटिंग कोण करतंय, पहिल्या इनिंगमध्ये आघाडी कोण घेतंय, या साऱ्या बाबी मॅच कोणाच्या बाजूने जाऊ शकेल, ते ठरवणार आहेत. त्यातच कांगारुंच्या दृष्टीने एक मोठा धक्का म्हणजे वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड संघात नसणं. दुखापतीमुळे तो संघाबाहेर गेलाय. त्यामुळे मुख्य मदार कमिन्स आणि स्टार्कवर असेल. लायनसारखा अनुभवी स्पिनर संघात आहेच. शिवाय बोलँडला संघात स्थान मिळेल, ही अपेक्षा व्यक्त होतेय. अर्थात आपला बॅटिंग फॉर्म आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं मनोधैर्य पाहता या आक्रमणालाही आपण तोंड देऊ शकतो. अॅडव्हान्टेज भारत अशी स्थिती असली तरी सामन्याच्या कोणत्याही सत्रात आपल्याला ढिलाई परवडणारी नाही. कांगारु जखमी वाघाच्या भूमिकेत आहेत. पलटवार करण्यासाठी त्यांचेही हात शिवशिवत असतील. तेव्हा गेल्या वेळसारखं त्यांना पहिल्याच दिवशी दबावाच्या पिंजऱ्यात जेरबंद करा आणि अॅडलेडवरही झेंडा फडकवत २-० कडे जाऊया, असंच आपण रोहितसेनेला सांगूया.