नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
मुख्यमंत्रीपदाच्या आजच्या शपथविधी सोहळ्यात नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाने स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज शपथ घेतली. मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा आले आणि मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. मात्र, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद गेले, त्यांना उपमुख्यमंत्रीपदी शपथ घ्यावी लागल्याने आधीच शिवसेना नेते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यात, आजच्या शपथविधी सोहळ्यात योग्य मान-सन्मान न झाल्यावरून शिवसेना (Shivsena) शिंदे गट नाराज झाला आहे. शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. मात्र, आज लगेच पहिल्या दिवशी मी तक्रार करणार नाही, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, आजच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीयमंत्री, भाजपचे दिग्गज नेते, वरिष्ठ नेते, सेलिब्रिटी, उद्योगपती यांची मोठी गर्दी होती. याशिवाय आमदार, खासदार आणि महायुतीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने आझाद मैदानावर उपस्थित होते.
मुख्यमंत्रीपदाच्या आजच्या शपथविधी सोहळ्यात नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता. सगळे मुख्य नेते मागे बसले होते, तिन्ही पक्षात पासेस येणार होते, ते आले पण थोडाफार ढिसाळपणा जाणवल्याचे पावसकर यांनी म्हटलं. मुख्य स्टेजवर आमचे एक केंद्रीय मंत्री होते . पण, पक्षाची नेतेमंडळी पण असती तर बरं झालं असतं. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होतं की, आपला नेता का नसावा व्यासपीठावर, काही नेते जायला हवे होते स्टेजवर, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, राज शिष्टाचार प्रशासनाकडूनही कळत नकळत चूक झाली आहे. त्यामुळे, दखल तर घ्यावी लागेल, पण आज लगेच पहिल्या दिवशी आपण तक्रार करणार नाही, असेही पावसकर यांनी म्हटले.
दरम्यान, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तर, स्वतः एकनाथ शिंदे यांनीही आपण नाराज नसल्याचं सांगितलं. मात्र, एकनाथ शिंदे यांची आजची देहबोली पुन्हा एकदा नाराज असल्यासारखीच होती. शिंदे यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत, त्यामध्ये शपथविधीवेळी देखील त्यांचा चेहरा गंभीर दिसून येत आहे. त्यामुळे, महायुतीमध्ये तिसरा पक्ष आल्याने शिवसेना शिंदे गट अगोदरपासूनच नाराज असल्याची चर्चा होती. आता, महायुती 2 सरकारमध्ये सुरुवातीपासूनच नाराजी नाट्य उमटल्याचे पाहायला मिळत आहे.