Nashik News : आई! लग्न नाही करायचं, शिकायचंय, खेळायचंय... नाशिक जिल्ह्यात बालविवाह थांबणार कधी?
Nashik News : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील 2 तर नाशिक तालुक्यात 1 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
Nashik News : डिजिटल इंडिया (Digital India) म्हणून भारताची ओळख सर्वदूर पोहोचत असताना आजही बालविवाह (Child Marriage) रोखण्यात सरकारी यंत्रणा, सामाजिक व्यवस्थेला अपयश आलेले आहे. खेळत्या वयात विवाह लावून देऊन संसाराचा गाडा हाकण्याची वेळ चिमुकल्यांवर आल्याचे वारंवार अधोरेखित होत आहे. अशातच नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या बालविवाह प्रतिबंधात्मक धडक मोहिमेअंतर्गत जिल्हा प्रशासनाने 3 बालविवाह रोखसे आहे. यामध्ये त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील 2 तर नाशिक तालुक्यात 1 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
गेल्या काही दिवसांत नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी (Igatpuri) तालुक्यात बाळ विवाहाच्या घटना समोर आलेल्या आहेत. प्रशासनाने कारवाई करत कुटुंबियांना समज दिल्यानंतरही इतर ठिकाणी बालविवाहाच्या घटना घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी महिला व बालकल्याण (Nashik ZP) विभागाला बालविवाह प्रतिबंधात्मक मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते, त्यानुषंगाने महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांनी विशेष मोहीम राबवत पहिल्या टप्प्यात बालविवाह करु नये, बालविवाहाचे दुष्परिणाम, बालविवाह होणार असल्याचे कळाल्यास तक्रार कुठे करावी याबद्दल जनजागृती करण्यात आली. यासंदर्भात गावांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम देखील घेण्यात आले.
मात्र तरीदेखील काही ठिकाणी बालविवाह होत असल्याबाबतची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धुमाळपाडा ता. त्र्यंबकेश्वर येथील येथील 15 वर्षीय व 14 वर्षीय अशा दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखण्यात आले. त्याचबरोबर कुटुंबियांचे देखील समुपदेशन करण्यात आले. या कारवाईमध्ये पोलीस यंत्रणेची देखील मदत घेण्यात आली. या कारवाईमध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी भारती भारती गेजगे, अंगणवाडी पर्यवेक्षिका संगीता सोनवणे, ग्राम बाल दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. नाशिक तालुक्यात देवरगाव येथील वैष्णवनगर येथे एका 16 वर्षीय बालिकेचा विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती ही प्रशासनाला मिळाली होती.
इथे साधा संपर्क
यासंदर्भात महिला बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती देशमुख यांनी कारवाई करत हा बालविवाह रोखला, यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गणेश म्हस्के, ग्रामविकास अधिकारी हरी सुर्यवंशी यांनी देखील सहभाग घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या कारवाईबद्दल सर्व सहभागी अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बालविवाह होणार अथवा झालेले आढळल्यास प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात कुठेही बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यास 1098 या क्रमांकावर तक्रार करावी असे आवाहन महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांनी केले आहे.