Inter Faith Marriage: लग्नासाठी धर्मांतर, मात्र सासरची मंडळी म्हणाली योग्य पद्धतीने हिंदू धर्म स्वीकारला नाही, प्रकरण हायकोर्टात
Bombay High Court: हिंदू धर्म स्वीकारलेल्या साहिल नावाच्या व्यक्तीनं मुंबई उच्च न्यायालयात दावा केला आहे की, त्याच्या पत्नीला तिच्या कुटुंबीयांनी बळजबरीनं कैद केलं आहे.
Inter Faith Marriage: एका व्यक्तीनं आपल्या पत्नीचा ताबा मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचं (Bombay High Court) दार ठोठावलं आहे. या व्यक्तिनं हेबियस कॉर्पस (Habeas Corpus) याचिका दाखल केली आहे. या व्यक्तीचा आरोप आहे की, याच्या पत्नीला तिच्या कुटुंबातील सदस्यांनी जबरदस्तीनं आणि बेकायदेशीरपणं त्याच्यापासून दूर केलं आहे. दरम्यान, ही व्यक्ती मुस्लिम असून त्याची पत्नी हिंदू धर्मातील आहे. आपल्या पत्नीसाठी तिच्या कुटुंबियांच्या सांगण्यावरुन या व्यक्तीनं धर्मांतर करुन हिंदू धर्म स्विकारला होता. पण, त्यानं धर्मांतर केल्यानंतर पत्नीच्या कुटुंबियांनी मात्र तू योग्य पद्धतीनं हिंदू धर्म स्विकारल्याचं त्याला सांगितलं आणि त्याच्या पत्नीला स्वतःसोबत घेऊन गेले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं मीरा रोडवरील नयानगर पोलीस ठाण्याला याचिकाकर्त्यांच्या पत्नीला 20 जून रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि गौरी गोडसे यांनी साहिल चौधरी नावाच्या व्यक्तीच्या याचिकेवर हे निर्देश दिले आहेत.
हिंदू मुलीशी लग्न करण्यासाठी धर्म बदलला
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, याचिकेत साहिल, जो पूर्वी फैज अन्सारी होता, त्याची मेनका (नाव बदलले आहे) सोबत 2017 मध्ये भेट झाली होती. दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. काही काळानंतर दोघांनी लग्न केलं. मात्र, मेनकाच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हतं. त्यामुळे त्यानं मेनकासाठी आपला धर्म बदलण्याच्या निर्णय घेतला. फैज अन्सारी धर्म बदलून साहिल चौधरी झाला.
रिपोर्टनुसार, दोघांनी 26 फेब्रुवारी 2022 रोजी वांद्रे येथील एका मंदिरात लग्न केलं होतं. 8 जुलै 2022 रोजी मुंबई महापालिकेत त्यांच्या लग्नाचं रजिस्ट्रेशनही करण्यात आलं होतं. याचिकेनुसार, साहिल हा मुंबईचा रहिवाशी होता, त्यामुळे दोघांना लग्नानंतर वेगळं राहावं लागलं.
लग्नानंतर एक वर्षभर राहिले वेगळे
8 फेब्रुवारी 2023 रोजी मेनकानं वडिलांचं घर सोडलं आणि साहिलसोबत राहू लागली. यानंतर मेनकाच्या वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यावर साहिल आणि मेनका या दाम्पत्याला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. जिथे मेनकानं ती तिच्या पतीसोबत राहत असून कुठेही बेपत्ता न झाल्याची कबुली दिली होती.
साहिलनं सांगितलं आहे की, एका पोलीस अधिकाऱ्यानं त्याला आणि त्याच्या पत्नीला तिच्या वडिलांसोबत चार दिवसांसाठी माहेरी पाठवायला सांगितलं. पोलीस अधिकाऱ्याच्या बोलण्याला दुजोरा देत साहिलही तयार झाला. 25 फेब्रुवारीपर्यंत दोघांमध्ये संवाद सुरू होता आणि यादरम्यान त्याच्या पत्नीनं त्याला तिला तिथून परत घेऊन जाण्यास सांगितलं.
सासऱ्यांनी धाडली नोटीस
याचिकाकर्त्यानं याचिकेत म्हटलंय की, याचिकेत नमूद करण्यात आल्यानुसार, मेनका साहिलकडे सातत्यानं तिला पुन्हा त्याच्यासोबत घेऊन जाण्याचा आग्रह करत होती. 18 मार्च 2023 रोजी, साहिलला मेनकाच्या वकिलांकडून एक नोटीस मिळाली. ज्यामध्ये साहिलनं योग्य पद्धतीनं हिंदू धर्म न स्विकारल्यानं त्याचं लग्न वैध नाही, असं त्या नोटिशीत नमूद करण्यात आलं होतं. तसेच, बीएमसीलाही नोटीस पाठवून त्याच्या लग्नाची नोंदणी रद्द करण्यास सांगितलं होतं.
याचिकेत दावा करण्यात आला आहे की, मेनकाच्या कुटुंबीयांची इच्छा आहे की, तिनं साहिलसोबतचं नातं तोडून दुसरीकडे लग्न करावं. त्यानंतर न्यायालयानं मीरा रोड पोलिसांना मेनकाला 20 जून रोजी न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले आहेत.