Mumbai Police: मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्यावर खंडणी चा गुन्हा दाखल
अटकेत असलेल्या आरोपीकडे खंडणी मागितल्या प्रकरणी शालिनी शर्मा यांच्यासह एका निलंबित पोलीस अधिकारी आणि अन्य एकावर खंडणीचा हा गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई: महाराष्ट्र पोलीस दलातील महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्यावर चेंबूर पोलीस ठाण्यात खंडणी तसेच धमकी देणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या आरोपीकडे खंडणी मागितल्या प्रकरणी शालिनी शर्मा यांच्यासह एका निलंबित पोलीस अधिकारी आणि अन्य एकावर खंडणीचा हा गुन्हा दाखल झाला आहे.
चेंबूर पोलीस ठाण्यात एक वर्षापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून शालिनी शर्मा या कार्यरत होत्या. निलंबित पोलीस अधिकारी अनिल उर्फ भानुदास जाधव आणि त्यांचा हस्तक राजू सोनटक्के अशी इतर आरोपी़ची नावे आहेत. या आरोपींमधील निलंबित पोलीस अधिकारी अनिल जाधव याने अटकेत असलेल्या आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी 50 लाखांची खंडणी मागितली होती आणि पैसे न दिल्यास इतर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याची तक्रार त्या आरोपीची बहिण शहिदा कुरेशी यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. अशा प्रकारची तक्रार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही केली होती.
पोलिसांचा हस्तक राजू सोनटक्के याने आरोपींकडे दोन लाख रुपये व्हॉट्स अॅप कॉल करून मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. यावर गुन्हे शाखेच्या वतीने या तक्रारीची शहानिशा करून या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आता पुढील तपास गुन्हे शाखा करत आहे.
विशेष म्हणजे शालिनी शर्मा यांनी पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर नागपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमणुकीस असताना शाहीन बाग आंदोलन प्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्याशी खटका उडाल्यावर त्यांची अनपेक्षित बदली चेंबूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. आता खंडणीच्या या तक्रारीनंतर आता पोलीस या बाबत पुढे काय पावले उचलते त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Mumbai: मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या 10 डीसीपींच्या बदल्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे पोहोचल्या होत्या: सिताराम कुंटे
- चिथावणीखोर हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
- मोठी बातमी : चिथावणीखोर हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला अटक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
