(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BMC : मुंबईमध्ये पाणी कपात होणार नाही, राज्य सरकारच्या हमीनंतर 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय मागे
BMC Water Crisis : गेल्यावेळच्या तुलनेत सद्यस्थितीला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यामध्ये 5.58 टक्के पाणी साठा कमी आहे.
मुंबई : राज्य शासनाच्या हमीमुळे मुंबईच्या पाणीपुरठ्यातील प्रस्तावित 10 टक्के कपात (BMC Water Cut) होणार नाही. प्रस्तावित पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.
यंदाच्या वर्षी कमी पर्जन्यमानामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये, म्हणून महाराष्ट्र शासनाच्या साठ्यातून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली होती. मुंबईच्या पाण्याचा तुटवडा निभावणी साठ्यातून उपलब्ध करून देण्याची हमी राज्य सरकारकडून मिळाल्यानेच पाणीपुरवठ्यातील प्रस्तावित 10 टक्के कपात करण्यात येणार नाही, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.
यापूर्वीच्या दोन वर्षात 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्यात सक्रिय होता. मात्र यंदाच्या पावसाळ्यात ऑक्टोबर 2023 मध्ये पाऊस झाला नाही. त्यामुळे गेल्यावेळीच्या तुलनेत सद्यस्थितीला धरणसाठ्यामध्ये 5.58 टक्के पाणी साठा कमी आहे.
शुक्रवार, 1 मार्च 2024 रोजी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये एकूण साठ्याच्या 42.67 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळेच नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करण्याबाबतचा अंदाज पाहता तसेच मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता पाहता 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत घेण्यात आला होता. मात्र राज्य शासनाकडून मिळालेल्या हमीमुळेच कोणत्याही प्रकारची पाणीकपात करण्यात येणार नाही.
असं असलं तरीही मुंबईकरांनी पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.