BMC Covid Scam : कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी ईडीच्या रडारवर, जैस्वाल यांच्यानंतर आणखी 2 अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार?
Mumbai Covid Scam : मुंबई महापालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी ईडीच्या रडारवर पाहायला मिळत आहेत.
Mumbai Covid Scam : मुंबई महापालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी ईडीच्या रडारवर पाहायला मिळत आहेत. संजीव जैस्वाल यांच्या पाठोपाठ आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता. काय आहे नेमकं काय? ईडीकडून कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सलग दोन दिवस मुंबई, ठाण्यासह 14 ठिकाणी छापेमारी केली गेली. या छापेमारीत ईडीच्या हाती कोट्यावधींचे घबाड लागले आहे. अशातच मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कोविड काळात बहुतांश निर्णय महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या मंजुरीनेच घेण्यात आले, तर त्यासंबंधाचे व्यवहार पालिकेच्या खरेदी खाते विभागाने हाताळले. या खात्याची सूत्रे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या हाती आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही अधिकाऱ्यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
कोरोना काळात मुंबईतील कोविड सेंटर उभारणे, ऑक्सिजन पुरवठा, औषधे, रेमडेसिव्हिर यांची खरेदी विनानिविदा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापालिका स्थायी समितीने कोरोना उपाययोजनांसाठी खर्चाचे अधिकार एका ठरावाद्वारे आयुक्तांना दिले होते. मात्र आयुक्तांनी ठरावातील अटी-शर्तीनुसार स्थायी समितीकडे वेळोवेळी प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले नाहीत. अनेक प्रस्ताव परस्पर मंजूर करून खर्चाचा हिशोबही दिला नाही. त्यामुळे कोरोना कालावधीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.
मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची याआधी देखील चौकशी याप्रकरणी ईडीकडून करण्यात आली आहे. सोबतच तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांना देखील ईडीकडून समन्स करण्यात आला आहे. अशातच खरेदी खाते विभाग हाताळणाऱ्या पी. वेलरासू यांना देखील बोलावलं जाऊ शकतं. राज्य सरकारकडून यासंदर्भात एसआयटी नेमलेली आहे, दुसरीकडे ईडीकडून देखील धागेदोरे तपासत पुरावे गोळा करत एके-एकाला चौकशीसाठी समन्स पाठवले जातायत. अशातच मुंबई पोलिस यांच्याकडून देखील यासंदर्भात चौकशी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कथित कोव्हिड सेंटर घोटाळ्यासंबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावं लागू शकतं. दरम्यान, सत्ताधारी भाजपकडून पालिकेच्या कामकाजावर टीका होताना दिसतेय.
कोरोना काळात महापालिकेने मुंबईत केलेल्या कामाची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचे सर्वांनी कौतुक देखील केले. यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आले. मात्र, आता कोरोना काळातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. चहल आणि पी. वेलरासू हे 3 वर्षांहून अधिक काळ या पदावर आहेत. महापालिकेचा संपूर्ण कारभार आता केवळ प्रशासनाच्या हाती आहे. अशा परिस्थितीत चहल, जैस्वाल यांच्यासह वेलरासू यासंबंधीच्या चौकशांना सामोरे जाणार का? हे बघणं महत्त्वाचे असेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :