Mumbai Metro : मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट; मेट्रो मार्ग 2अ आणि 7 वरील शेवटच्या ट्रेनच्या वेळेत बदल; शनिवारपासून वेळेत बदल होणार
Mumbai Metro last Train Time : मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबई मेट्रोने आता रात्री आणखी उशिरापर्यंत प्रवास करता येणार आहे. यासाठी मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 वरून शेवटच्या मेट्रोची वेळ बदलण्यात आली आहे.
मुंबई : मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (MMRDA) दिवाळी भेट दिली आहे. मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) आता रात्री आणखी उशिरापर्यंत प्रवास करता येणार आहे. यासाठी मेट्रो मार्ग 2 अ (Metro 2A) आणि 7 वरून (Metro 7) शेवटची मेट्रो आता 10.30 ऐवजी रात्री 11 वाजता सुटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एमएमआरडीएचे अध्यक्ष या नात्याने हा निर्णय घेतला आहे. शनिवार 11 नोव्हेंबरपासून मेट्रोच्या वेळेत (Mumbai Metrol Last Local Time) वाढ करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना पर्यावरणपूरक आणि आरामदायक मेट्रोने रात्री 11 पर्यंत सुरक्षित प्रवास करता येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, 'दिवाळी सण हा उत्साहाचा आहे. मुंबई मेट्रोची वेळ वाढवून हा उत्साह द्विगुणित करताना आनंद होत आहे. मुंबई मेट्रो ही एक शाश्वत आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. मुंबईकरांसाठी मुंबई मेट्रोची वेळ वाढविण्याचा महत्वाचा निर्णय आपण घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
कायमस्वरुपी वेळेत बदल
दिवाळी निमित्त मेट्रोची वेळ वाढविण्याची मागणी होत होती, पण त्यावर ही वेळ केवळ सणासाठी नाही तर कायमस्वरूपी वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मेट्रोची वेळ वाढवण्यात आल्यामुळे मुंबईकर प्रवाशांना आता रात्री उशिरापर्यंत सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अशी असणार नवीन वेळ
मुंबई मेट्रो मार्ग 2 अ च्या अंधेरी पश्चिम आणि मेट्रो मार्ग 7 च्या गुंदवली स्थानकावरून शेवटची मेट्रो आता 10.30 ऐवजी रात्री 11 वाजता सुटणार आहे. सध्या मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 वर गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार-शुक्रवार सकाळी 5.55 ते रात्री 10.30 या कालावधीत सुमारे 253 इतक्या सेवा या साडेसात ते साडे दहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत.
आता मेट्रोच्या वाढीव वेळेमुळे या स्थानकांदरम्यान सकाळी 5.55 ते रात्री 11 दरम्यान मेट्रोच्या 257 फेऱ्या होणार आहेत. तसेच, रात्री 10 नंतर दहिसर पश्चिम ते गुंदवलीपर्यंत दोन अतिरिक्त मेट्रोच्या फेऱ्या तर डहाणूकरवाडी ते अंधेर पश्चिम दरम्यान दोन अतिरिक्त मेट्रो फेऱ्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.