Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Farmers Protest March Towards Delhi : 101 शेतकऱ्यांचा एक गट नियोजनरित्या दिल्लीकडे कूच करत असून पोलिसांनी त्यांना पंजाब-हरियाणाच्या सीमेवरच रोखण्याचा प्रयत्न केला.
Farmers Protest March Towards Delhi : किमान हमीभाव आणि इतर मागण्यासंदर्भात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी आता पुन्हा एकदा चलो दिल्लीचा नारा दिला आहे. 101 शेतकऱ्यांच्या एका गटाने पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवरील शंभू आंदोलन स्थळावरून दिल्लीकडे कूच करण्यास सुरूवात केली आहे. संसदेत कायदा करून पिकांना हमीभाव देण्यात यावा यासह अनेक मागण्या शेतकऱ्यांनी केल्या असून त्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उचललं आहे.
पंजाब-हरियाणा सीमेवरच शेतकऱ्यांना अडवलं
दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना पंजाब-हरियाणाच्या सीमेवरच अडवण्यात आलं आहे. या दरम्यान पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. यावेळी शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नकळांड्या फोडल्या. शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवण्यात येत असून पुढे जाण्यासाठी परवानगी पत्र दाखवण्यास सांगितलं जात आहे. त्यामुळेच शंभू सीमेवरच शेतकरी आणि पोलिसांमध्ये मोठा वाद झाल्याचं दिसून आलं.
एका आंदोलक शेतकऱ्याने सांगितलं की, "पोलीस ओळखपत्रे मागत आहेत, पण त्यांनी आम्हाला दिल्लीला जाऊ देण्याची हमी द्यायला हवी. आम्हाला दिल्लीला जाऊ दिले जात नाही. मग आम्ही ओळखपत्र कशाला द्यायचे? त्यांनी परवानगी दिली तर आम्ही दिल्लीला जाऊ."
पोलिसांकडे 101 शेतकऱ्यांची यादी असल्याचा दावा
दरम्यान, पोलिसांनी दावा केला आहे की हा 101 शेतकऱ्यांचा नियोजित गट म्हणून नाही तर जमाव म्हणून फिरत आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी सामील आहेत. त्यामुळे ओळख पडताळणीनंतरच शेतकऱ्यांना पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल. आम्ही आधी त्यांची ओळख पडताळू आणि नंतर त्यांना दिल्लीत जाण्यास परवाना देऊ. आमच्याकडे 101 शेतकऱ्यांची यादी आहे.
पंजाब-हरियाणा सीमेवर सुरक्षा वाढवली
शेतकऱ्यांचा दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न पाहता पंजाब-हरियाणा सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. कलम 163 (पूर्वीचे कलम 144) अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश देखील सीमेवर लागू आहेत. त्यामुळे पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास मनाई आहे. शंभू सीमेव्यतिरिक्त पंजाब आणि हरियाणामधील खानौरी सीमा चार-स्तरीय सुरक्षेच्या माध्यमातून बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी 13 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
शांततेने आणि शिस्तीने दिल्लीला जाणार
शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर म्हणाले की, "किमान आधारभूत किंमत (MSP) साठी कायदेशीर हमीसह शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मागण्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्राने कोणतेही पाऊल उचललं नाही. केंद्राने शेतकरी आणि मजुरांशी चर्चा न करण्याचे ठरवले आहे. ते आम्हाला रोखण्यासाठी बळाचा वापर करत आहेत. आम्ही शांततेने आणि शिस्तीने दिल्लीला जाऊ."
ही बातमी वाचा: