Mumbai Local Train : आनंदाची बातमी! नवी मुंबईकरांना दिवाळी भेट, खारकोपर आणि उरण दरम्यान लोकल सुरू करण्यास मंजुरी
Kharkopar to Uran Local Train : खारकोपर ते उरण दरम्यान लोकल सेवा सुरू करण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे उरणकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई : उरण ते खारकोपर (Uran to Kharkopar) दरम्यानच्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. खारकोपर (Kharkopar) आणि उरण (Uran) दरम्यान लोकल सुरू करण्यास रेल्वे बोर्डाने (Railway Board) अखेर मंजुरी दिली आहे. तब्बल आठ महिन्यांनंतर मिळाली मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हा मार्ग सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर आता आठ महिन्यांनी रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) अखत्यारीत या मार्गावरील ही लोकल सेवा धावणार आहे.
खारकोपर आणि उरण दरम्यान आता लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढणार आहेत. यानंतर आता लोकल ट्रेनच्या 40 फेऱ्या या स्थानकांदरम्यान धावणार आहेत. आधीच नेरूळ आणि बेलापूरपासून खारकोपरपर्यंत दिवसाला 20 लोकल फेऱ्या सुरू आहेत. यातील काही लोकल उरण पर्यंत चालवण्यात येतील. तर काही नवीन लोकल फेऱ्या चालवल्या जातील. यामुळे नवी मुंबई विमानतळ, उरण या पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना लोकलने हार्बर मार्गावर येता येणार आहे.
आता प्रतीक्षा फेऱ्या वाढण्याची...
उरण रेल्वेच्या लोकार्पणासाठी तारखांवर तारीख मिळत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. एकीकडे उरण परिसरात शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. उरण परिसरात कंटेनर यार्ड, गोदामे वाढल्याने मुंबई, नवी मुंबई, पनवेल शहरातील कित्येक नागरिक रोजगाराच्या शोधात उरण परिसरात येत आहेत. तसेच शहरातून बहुसंख्य नागरिक, विद्यार्थी शिक्षण, रोजगारासाठी मुंबई, नवी मुंबईत दररोज प्रवास करत असल्याने उपलब्ध प्रवासी सेवा तोकडी पडत आहे. त्यामुळे आता रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यावर लोकलच्या फेऱ्या कधी वाढणार, याची प्रतीक्षा स्थानिकांना आहे.
महामुंबईतील प्रवाशांसाठी 400 किमीपर्यंत लोकल विस्तार करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या लोकार्पण कार्यक्रमात केली होती. हा विस्तार पूर्ण करण्यासाठी बेलापूर-उरण मार्ग, कर्जत-पनवेल नवीन रेल्वेमार्ग, विरार-डहाणू चौपदरीकरण या प्रकल्पांची पूर्ती होणे गरजेचे आहे. मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या प्रकल्पात बेलापूर-खारकोपर-उरण मार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे महामुंबईतील नवी शहरे लोकलच्या टप्प्यात येणार आहेत.
मागील जवळपास 25 वर्षांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या नेरुळ ते उरण लोकल मार्गावरील उरण खारकोपर दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले होते. त्यामुळे मार्गावरील लोकल धावण्याची प्रतीक्षा आहे. उरण ते खारकोपर या मार्गावरील अपूर्ण असलेल्या रेल्वेच्या कामानाही वेग आला आहे. आता, रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर लवकरच प्रवाशांच्या सेवेत लोकल रुजू होईल अशी अपेक्षा आहे.