ABP Majha Impact : बदलापुरात 5 तास बत्ती गुल, एबीपी माझाने बातमी दाखवताच वीज पुरवठा सुरळीत
महावितरणच्या संपाचा फटका बदलापुरातील नागरिकांनाही बसला. अनेक भागात पाच तास वीज नसल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र एबीपी माझाने बातमी दाखवताच वीज पुरवठा सुरळीत झाला.
बदलापूर : महावितरणच्या संपाचा फटका बदलापूर शहरातील अनेक भागांना बसला होता. या भागात गेल्या पाच ते सहा तासांपासून वीज गायब असल्याने शहरातील अनेक भाग अंधारात बुडाली होती. मात्र एबीपी माझाने बातमी दाखवताच ज्या ज्या भागात वीज गायब झाली होती तिथली वीज पुन्हा आली आहे.
खाजगीकरण आणि कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ सोमवारपासून (28 मार्च) अनेक संघटनांनी राज्यात संप पुकारला आहे. या संपामध्ये बँक कर्मचाऱ्यांसोबत महावितरण कर्मचारी देखील सामील झाले आहेत. मात्र महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील अनेक भागांना त्याचा फटका सहन करावा लागला. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात अनेक भागात सोमवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान वीज पुरवठा खंडित झाला होता. लाईट आता येईल, नंतर येईल अशी आशा नागरिकांना होती. मात्र रात्र होत आली तरी वीज काही येत नव्हती. बदलापूरकरांनी महावितरण कार्यालय आणि त्यांच्या अभियंत्यांशी संपर्क करुन वीज पुरवठा कधी सुरळीत होईल यासंदर्भातची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र महावितरणकडून कोणताच प्रतिसाद बदलापूरकरांना मिळाला नाही. त्यामुळे अनेक गृहिणींना अक्षरशः मेणबत्तीच्या प्रकाशात जेवण बनवण्याची पाळी आली.
मात्र एबीपी माझाने यासंदर्भात बातमी प्रसारित करताच अवघ्या एक तासात ज्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता त्या भागातील वीज पुरवठा पुन्हा सुरळीत झाला.
वीजबिल थकल्यानंतर महावितरणकडून थकित वीज बिल भरण्यासाठी शहरभर रिक्षा फिरवत स्पीकरद्वारे नागरिकांना सूचना केली जाते. मात्र वीज गायब झाल्यावर ती कधी येणार आणि वीज गायब होण्याचे नेमकं कारण काय आहे यासंदर्भातली कोणतीही माहिती आम्हाला वीज वितरण कंपनी देत नाही, अशी तक्रार यावेळी नागरिकांनी केली.
एकूणच काय महावितरणचा सोमवार आणि मंगळवार असा सलग दोन दिवस संप असल्याने नागरिकांना या दोन दिवसात विजेविना आणखी किती हाल सहन करावे लागतील असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.