Ladki Bahin Yojana : तिजोरीमधील पैसा संपत आल्यानेच लाडक्या बहिणीला निकष; आता केंद्रीय मंत्र्याचाच महायुती सरकारला घरचा आहेर!
लाडकी बहिण योजनेंतर्गत महिला लाभार्थींची संख्या 2 कोटी 46 लाख होती. त्यापैकी 5 लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले. फेब्रुवारीमध्ये सुमारे चार लाख महिलांना अपात्र घोषित केले जाण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेला सुरुवात केली त्यावेळी सरकारच्या तिजोरी मध्ये निधी होता. मात्र, आता तिजोरीतील पैसे संपत चालले आहेत. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना निकष लावण्यात येत असल्याचे सांगत सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला. गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेला मिळेल त्या मार्गाने निकष लावण्यात येत असून यामुळे अनेक महिलांनी स्वेच्छेने पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल पाच लाखांवर महिला या योजनेतून बाजूला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे रामदास आठवले यांनी एक प्रकारे आपल्या वक्तव्यातून सरकारला घरचा आहेर दिला.
राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकदा भेटले आहेत ते ठीक, पण..
पिंपरी चिंचवडमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी लाडकी बहीण योजनेवरून माहिती सरकारला घरचा आहेर दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रामदास आठवले यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, या निवडणुका कधीही होतील या पार्श्वभूमीवर महायुतीमधील तिन्ही पक्षांनी ही निवडणूक एकत्र लढवावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्या एन्ट्रीची रंगली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितले की, राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकदा भेटले आहेत ते ठीक आहे. मात्र, वारंवार भेट घेणे हे बरोबर नसल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे यांना महायुती घेणे बरोबर नसल्याचे सुद्धा ते म्हणाले. त्यांचा काही फायदा होत नाही. ते आले तर आम्हाला काय मिळणार अशी सुद्धा विचारणा त्यांनी केली. मित्र पक्षांनी आम्हाला विचारात घेतले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.
सुमारे 5 लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले
दुसरीकडे, जानेवारीच्या तुलनेत यंदा फेब्रुवारीमध्ये लाभार्थींच्या संख्येत मोठी घट होणार आहे. डिसेंबरअखेर लाडकी बहिण योजनेंतर्गत महिला लाभार्थींची संख्या 2 कोटी 46 लाख होती. त्यापैकी सुमारे 5 लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले. त्यानंतर जानेवारीअखेर लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटी 41 लाख झाली. आता फेब्रुवारीमध्ये सुमारे चार लाख महिलांना अपात्र घोषित केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारचे 945 कोटी रुपये वाचणार आहेत. वास्तविक, नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहिन योजनेचा लाभ पाच लाख महिला घेत आहेत. या महिलांना लाडकी बेहन योजनेतून केवळ 500 रुपये मिळतील, तर नमो शेतकरी योजनेतून त्यांना 1000 रुपये मिळतील. काही महिलांनी स्वेच्छेने या योजनेचा लाभ घेणे बंद केले आहे. सरकारने असेही म्हटले होते की, ज्या महिला वृद्ध आहेत आणि वृद्धापकाळ निवृत्तीवेतन सारख्या योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना 1500 रुपये
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाकांक्षी लाडकी बहिण योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. अटींनुसार, 21-65 वर्षे वयोगटातील महिला ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेमुळेच महायुती सत्तेत आली आहे. मात्र, आता सत्ता आल्यानंतर घोषणेप्रमाणे योजनेचे पैसा वाढवणं दूर, पण निकष लावून बहिणींना बाजूला केल्या जात आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या























