बबन गिते गँगने बीड जेलमध्येच डाव साधला, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला धुतला, सुरेश धस यांचा दावा!
Walmik Karad: बबन गिते यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी यांच्यात मारामारी झाली.

Walmik Karad बीड: बीड जिल्हा कारागृहात आज (31 मार्च) दोन गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. परळीमधील दोन गटात मारामारी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या मारहाणीत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेलाही मारहाण झाल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. बबन गिते गँगमधील महादेव गितेने वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. सुरेश धस यांच्या दाव्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.
बीड जिल्हा कारागृहात सकाळच्यावेळी बबन गिते (Baban Gite) यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी यांच्यात मारामारी झाली. याच कारागृहामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना देखील ठेवण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार परळीतील दोन गटात ही मारामारी झाल्याचे समजत आहे. यामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला देखील मारहाण करण्यात आली.
सुरेश धस काय म्हणाले?
सदर प्रकरणावर सुरेश धस एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, वाल्मिक कराड विरुद्ध बबन गिते अशा परळीतल्या टोळीयुद्धाचा हा परिणाम आहे. वाल्मिक कराड आधी म्हणायचे की, याला संपवल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही. तर गित्ते म्हणायचा की कराडला संपवल्याशिवाय मी दाढी करणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात नावं चुकीच्या पद्धतीनं नावं गोवली यावरून ही मारहाण झाली असावी, असं सुरेश धस यांनी सांगितले. कारागृहातील सुरक्षा आणि बीड पोलिस यावर चार तासांचा सिनेमा निघेल. मी तिथे जाऊन पोलिसांशी बोलून जास्त माहिती देतो, असंही सुरेश धस यांनी सांगितले.
नऊ महिन्यांपासून बबन गिते फरार-
दरम्यान, बापू आंधळे हे मरळवाडीचे सरपंच म्हणून निवडून आले होते. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये. सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गिते याच्यासह मुकुंद गिते, महादेव गिते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खून झालेल्या आणि खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तींना राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे हे प्रकरण संपूर्ण राज्यभर तापू लागलंय. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि खून प्रकरणातील आरोपी बबन गिते अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान आंधळे खून प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दिल्या गेल्या होत्या. एकूण 11 जणांवर गुन्हा नोंद होता. यात वाल्मिक कराड विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. मात्र परळी पोलिसांनी तपासात वाल्मिक कराडचा सहभाग नसल्याचे सांगून त्याचे नाव आरोपीतून वगळले आहे. उर्वरित आरोपी अटक असून केवळ बबन गिते फरार आहे.
वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला धुतला, VIDEO:
संबंधित बातमी:
Beed: मोठी बातमी: वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा, बबन गीते समर्थकांची कारागृहातच हाणामारी























